ठाण्यात काँग्रेसच्या बॅनरबाजीमुळे चर्चेला उधाण

पोलिसनामा ऑनलाईन टीम – ठाण्यामध्ये एका बॅनरवर केवळ दोनच पक्षातील नेत्यांचे फोटो लावल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ठाणे काँग्रेसने, आम्ही पाठिंबा दिला नसता तर ठाकरे सरकार सत्तेवर आले असते का ? अशा आशयाचा पोस्टर लावून खुलेपणाने नाराजी व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड या ठाण्यातील दोन मंत्र्यांना देखील काँग्रेस सत्तेत आहे याचा विसर पडला आहे का ? असा सवाल ठाणे काँग्रेस अध्यक्षांनी करत त्यांच्यावर टीका देखील केली आहे.

मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत एम एम आर क्षेत्रात असलेल्या 8 महानगरपालिका आणि 7 नगरपालिका स्वतंत्र एस आर ए प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मुंबई सोडून या महानगरपालिका मधील नागरिकांचे विनामूल्य घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण होईल. येण्यासाठी आभार व्यक्त करणारा एक बॅनर स्लम डेव्हलपर्स आणि आर्किटेक्ट असोसिएशनने तीन हात नाक्यावर लावला आहे. या बॅनरवर ठाकरे सरकारची वचनपूर्ती असे म्हणत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो लावला आहे.

याच बॅनर वर स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. आनंद दिघे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा देखील फोटो लावण्यात आलेला आहे. याच बॅनरला ठाणे काँग्रेस अध्यक्षांनी आक्षेप घेतला आहे . या बॅनरला उत्तर म्हणून बाजूलाच, सरकार तिघांचे मग नाव का फक्त दोघांचे असा प्रश्न विचारत बॅनर लावण्यात आला आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला नसता तर जनकल्याण करणारे ठाकरे सरकार, महाराष्ट्रात सत्तेवर आले असते का? असा थेट प्रश्न विचारून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी हा बॅनर लावलेला असून एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड या दोघांवर खरमरीत टीका देखील त्यांनी केली आहे.