Coronavirus : इस्त्रायलचे आरोग्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीला ‘कोरोना’ची लागण, दोघेही ‘आयसोलेश’नमध्ये

जेरुसलेम :  वृत्तसंस्था –  जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या विषाणूची लागण सामान्य लोकांनाच होत नाही तर अतिमहत्त्वाच्या लोकांना देखील याची लागण होत आहे. इस्त्रायलच्या आरोग्य मंत्र्यांनाच कोरोनाची लागण झाली आहे. एवढेच नाही तर त्यांच्या पत्नीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या दोघांना आयसोलेशनमध्ये दाखल करण्यात आले आहे. या दोघांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाने त्यांना दिली आहे.

यासंदर्भात येथील आरोग्य विभागाने म्हटले आहे की, 71 वर्षांचे आरोग्यमंत्री आणि त्यांची पत्नी यांची प्रकृती ठिक आहे. त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर योग्य प्रकारे वैद्यकीय उपचार सुरु आहेत. याची माहिती पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना देण्यात आली असल्याची माहिती इस्त्रायलच्या एका संकेतस्थळाने दिली आहे. दरम्यान याकोव्ह लिट्झमॅन हे इस्त्रायलमधील सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाली असली तरी ते घरून काम सुरुच ठेवतील असे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

मोसादचे प्रमुखही आयसोलेशनमध्ये

इस्त्रायलचे ब्रॉडकास्ट एजंन्सीने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी इस्त्रायलची गुप्तचर संस्था मोसादच्या प्रमुखांनी लिट्झमॅन यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता तेही आयसोलेशनमध्ये गेले आहेत. इस्त्रायलच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, येथे कोरोनामुळे आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 हजाराहून अधिक लोकांना लागण झाली आहे.

5 आठवड्यात मृतांचा आकडा दुप्पट

याबाबत डब्ल्यूएचओचे संचालक अदनोम घेब्येयियस यांनी बुधवारी सांगितले की, कोरोना व्हायरस हळूहळू चौथ्या टप्प्यात प्रवेश करत आहे. अशातच कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वेगाने वाढणार आहे. कोरोनाचा वाढता आकडा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनणार आहे. मागील पाच आठवड्यात कोरोनाबाधितांचा आकडा आणि मृत्यू होण्याची संख्या दुपटीने वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.

You might also like