Mission Shakti : ‘नासा’चा टीकेचा बाण ‘इस्रो’ने परतवला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र चाचणीने (Mission Shakti) आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राला (ISS) धोका निर्माण झाल्याचं सांगत नासाने (NASA ) आक्षेप नोंदवला होता. त्याला भारताने प्रत्युत्तर देत नासाच्या शंकांचे निरसन केले आहे. ‘मिशन शक्ती’च्या चाचणीमुळे अंतराळात निर्माण झालेला कचरा पुढील सहा महिन्यात जळून नष्ट होईल, अशी माहिती इस्रो अध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागार तपन मिश्रा यांनी दिली.

काय आहेत नासाचे आक्षेप –

मिशन शक्ती’ मोहीमेत भारताने क्षेपणास्राने उपग्रह नष्ट केला. यामुळे अंतराळात मोठ्या प्रमाणात कचरा होऊन ४०० तुकडे पसरले आहेत. भारताची ही क्षेपणास्त्र चाचणी ३०० किलोमीटवर करण्यात आली. आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रपासून हे ठिकाण खालच्या भागला आहे. पण यामुळे झालेल्या कचऱ्यातील २४ मोठे तुकडे आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रच्या दिशेने येत आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राला धोका निर्माण झाला आहे, असा दावा नासाचे प्रमुख जिम ब्रिडेनस्टाइन यांनी केलाय. हा प्रकार अतिशय भयंकर आहे. अशा घटनांमुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर मोठ्या प्रमाणात कचरा जमा होण्याची भीती आहे. यापुढे अधिक सतर्क राहावं लागणार आहे. अशा घटना स्वीकार्य नाही. आता आम्ही १० सेंटीमीटर (६ इंच) पेक्षाही मोठ्या तुकड्यांबद्दल बोलतोय. असे आम्ही ६० तुकडे शोधले आहेत, असं नासाचे प्रमुख म्हणाले होते.

नासाच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना तपन मिश्रा म्हणाले की, ‘ देशाची मान खाली जाईल असं कुठलंही काम आम्ही केलं नाही. मिशन शक्ती’च्या चाचणीमुळे अंतराळात निर्माण झालेला कचरा पुढील सहा महिन्यात जळून नष्ट होईल. भारताने अंतराळात ३०० किमी उंचीवर चाचणी केली. तिथे हवेचा दाब खूपच कमी असतो. परंतु, तो कचरा जाळून नष्ट करण्यास पुरेसा आहे.’
बऱ्याचदा लग्नात आपले काही खास मित्रही जेवणाला नावं ठेवतात. आपण जेव्हा काही वेगळं काम करतो तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला हार घातले जात नाहीत. हा जीवनाचा भागच आहे, अशी मार्मिक टिप्पणीही त्यांनी केली.

भारताने नासाचा दावा फेटाळला

डीआरडीओचे माजी प्रमुख व्ही.के. सारस्वत यांनी नासाचा दावा बिनबुडाचा असल्याचं म्हटलंय. नासाच्या प्रमुखांचे वक्तव्य अतिशय काल्पनिक आहे. भारताच्या प्रगतीत अडथळे आणण्याचा अमेरिकेचा हा जुनाच फंडा आहे. क्षेपणास्त्र चाचणीमुळे झालेले तुकडे हे फार काळ अंतराळात टिकणारे नाहीत. तसंच चाचणीनंतर ३०० किलोमीटर अंतरावर असलेल्या या तुकड्यांना गती किंवा ऊर्जा न मिळल्याने ते पृथ्वीच्या कक्षेत येऊन जळून नष्ट होतील, असं सारस्वत यांनी स्पष्ट केलं.