धक्कादायक ! ISRO च्या वैज्ञानिकाची घरात घुसून हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इसरोच्या वैज्ञानिकाची हत्या करण्यात आली आहे. हैदराबादच्या अमीरपेठ भागात हि घटना घडली असून एस.सुरेश असे या 56 वर्षीय वैज्ञानिकाचे नाव आहे. त्यांच्या या हत्येमुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ते नेहमीप्रमाणे कामावर न गेल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना फोन करून संपर्क साधला. मात्र त्यांच्याकडून काहीही संपर्क न झाल्याने त्यांनी त्यांच्या पत्नीला फोन करून माहिती दिली. त्यांच्या पत्नी चेन्नईमधील एका बँकेत नोकरी करत असून त्यांनी कुटुंबियांसह हैदराबादला आल्या. तसेच त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. सुरेश हे मूळचे केरळचे राहणारे असून ते हैदराबादमध्ये इस्रोच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर विभागात कार्यरत होते. त्यांच्या पत्नीने पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता ते मृताव्यस्थेत आढळले. डोक्यात जड वस्तूने प्रहार केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी प्रथमदर्शनी सांगितले आहे.

दरम्यान, पोलिसांनी त्यांचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पाठवला असून शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. त्यांची पत्नी चेन्नईमध्ये नोकरी करत असून ते मागील 20 वर्षांपासून हैदराबादमध्येच स्थायिक आहेत. त्यांचा मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला असून मुलगी दिल्लीमध्ये राहते.

Visit : Policenama.com