विष देऊन जीवे मारण्याचा झाला होता प्रयत्न; इस्त्रोच्या वैज्ञानिकाचा दावा

अहमदाबाद : वृत्तसंस्था – इस्त्रोचे मोठे वैज्ञानिक आणि अहमदाबाद स्पेस एप्लिकेशन सेंटरचे माजी संचालक तपन मिश्रा यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली असून त्यात त्यांनी त्यांना २०१७ मध्ये विष देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे म्हंटल आहे. या पोस्टमध्ये त्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न कोणी केला याबाबत स्पष्टता केली नाही. मला विष कोणी आणि का दिलं याबाबत मला कल्पना नसल्याचेही त्यांनी म्हंटल आहे.

तपन मिश्रा यांनी फेसबुक पोस्टमध्ये असं म्हंटल आहे की, बंगळुरू येथील मुलाखतीवेळी मला नाश्त्यातून २३ मे २०१७ मला जीवघेणा आर्सेनिक ट्रायऑक्साइड(Arsenic Trioxide) देण्यात आलं होतं, विष देण्यात आलं होतं, घरी जे आर्सेनिक दिलं जातं, ते ऑर्गेनिक होतं, जे विष मला दिलं होतं ते इनऑर्गेनिक ऑर्सेनिक होतं, याची एक ग्राम प्रमाणही कोणत्या मनुष्याला जीवे मारण्यासाठी पुरेसे असतं. यानंतर मागील २ वर्षापासून माझी अवस्था बिकट झाली होती, मुलाखतीनंतर कठीण प्रसंगातून मी बंगळुरूहून अहमदाबादला परतलो होतो. याठिकाणी आल्यानंतर मला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. तेव्हा स्थानिक रूग्णालयात दाखल केले, श्वास घेण्यास त्रास झाला, शरीराची त्वचा निघत होती, हातापायाच्या बोटांमधून नखे निघू लागली, न्युरोलॉजिकल समस्या उद्भवल्या, सौम्य ह्दयविकाराचा झटका आला, फंगल इंफेक्शन सुरू झालं होतं असं तपन मिश्रांनी सांगितले.

मिश्रा यांच्यावर अहमदाबादच्या जायडस कॅडिला, मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटल, दिल्लीच्या एम्समध्ये उपचार करण्यात आले, या उपचारासाठी जवळपास २ वर्ष लागली. मी भाग्यवान आहे कारण हे विष प्यायल्यानंतर कोणीही जिवंत वाचू शकत नाही, मी जानेवारी महिन्यात निवृत्त होणार आहे, त्यामुळे मी मेलो तरी माझ्यासोबत काय घडलं हे लोकांना माहिती असायला हवं म्हणून मी ही पोस्ट करत आहे.

फेसबुक पोस्टमध्ये मिश्रा यांनी पुरावा म्हणून तपास रिपोर्ट, एम्सची कागदपत्रे, हातापायाचे फोटो अपलोड केले आहेत. इस्त्रोमध्ये मोठ्या वैज्ञानिकांचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या बातम्या मिळतात, १९७१ मध्ये प्रोफेसर विक्रम साराभाई यांचाही संशयास्पद मृत्यू झाला, त्यानंतर १९९९ मध्ये VSSC चे संचालक डॉ. एस. श्रीनिवासन यांच्या मृत्यूवरही प्रश्न उपस्थित केले गेले, इतकचं नाही तर १९९४ मध्ये श्री नांबीनारायणचं प्रकरणही सगळ्यांसमोर आलं होतं, पण मला माहिती नव्हतं की, मी एक दिवस या रहस्याचा भाग बनेन असं मिश्रा यांनी म्हंटल आहे.