‘हे कसलं बक्षिस’ ! Chandrayaan-2 च्यापुर्वी सरकारकडून ISRO च्या वैज्ञानिकांच्या पगारात कपात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – एका बाजूला चांद्रयान – २ मोहिमेला सुरुवात करत असताना सरकारने इस्रोच्या वैज्ञानिकांना धक्का दिला आहे. या मोहिमेसाठी हे वैज्ञानिक दिवस रात्र एक करून कष्ट करत आहेत. मात्र त्याआधीच सरकरने या वैज्ञानिकांच्या वेतनात कपात केली आहे. १२ जून २०१९ रोजी काढलेल्या आदेशात सरकारने १९९६ पासून देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन अनुदान रक्कम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वैज्ञानिक आणि इंजिनियर हा प्रोत्साहनपर भत्ता दिला जात असे.  या आदेशात हि रक्कम बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार आता D, E, F आणि G श्रेणीमधील वैज्ञानिक आणि इंजिनियर यांना हा भत्ता मिळणार नाही. त्यामुळे आत जवळपास ८५ ते ९० टक्के वैज्ञानिक आणि इंजिनियरच्या वेतनात ८ ते १० हजार रुपयांची कपात होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक वैज्ञानिक आणि इंजिनियर नाराज झाले असल्याची माहिती मिळत आहे.

वैज्ञानिक आणि इंजिनियर यांची इस्रोमध्ये सहभाग वाढावा म्हणून सरकारने १९९६ मध्ये हा प्रोत्साहनपर भत्ता सुरु केला होता. या नवीन आदेशात हा भत्ता बंद करण्यात आल्याचा आदेश देण्यात आलेला आहे. आता यापुढे फक्त परफॉर्मेंस रिलेटेड इंसेंटिव स्कीम (PRIS) नुसार वेतन मिळेल. आतापर्यंत वैज्ञानिक आणि इंजिनियर दोघानांही प्रोत्साहनपर भत्ता आणि परफॉर्मेंस रिलेटेड इंसेंटिव स्कीम या दोन्हीनुसार वेतन मिळत होते. मात्र आता १ जुलैपासून हे बंद करण्यात आले आहे.

क श्रेणीत होते भरती

इस्रोमध्ये वैज्ञानिकांची भरती हि क श्रेणीमध्ये होते. त्यानंतर त्यांचे प्रमोशन  D, E, F, G आणि पुढच्या श्रेणीमध्ये केले जाते. प्रत्येक श्रेणीमध्ये प्रमोशनच्या वेळी एक चाचणी घेतली जाते. यामध्ये पास होणाऱ्यांना प्रमोट केले जाते. आणि त्यानंतर त्यांना प्रोत्साहनपर भत्ता दिला जात असे.

२०१२ ते २०१७ पर्यंत २८९ जणांनी दिला राजीनामा 

सरकार सर्व सुविधा देत असताना देखील इस्रोमधून मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक नोकरी सोडून जात आहेत. २०१२ ते २०१७ पर्यंत २८९  वैज्ञानिकांनी  आतापर्यंत नोकरी सोडली असून यामुळे इस्रोच्या चिंतेत भर पडली आहे.