ISRO च्या माजी शास्त्रज्ञाच्या बँक खात्यावर सरकारने जमा केले 1 कोटी 30 लाख रुपये, जाणून घ्या प्रकरण

पोलिसनामा ऑनलाईन – हेरगिरी प्रकरणात निष्कारण गुंतवल्याप्रकरणी भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’चे माजी शास्त्रज्ञ एस. नंबी नारायणन यांना सरकारने अतिरिक्त भरपाई म्हणून 1 कोटी 30 लाख रुपये नुकसान भरपाई दिली आहे. सरकारने ही रक्कम नंबी यांच्या खात्यावर जमा केले आहे.

इस्रोच्या अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांमध्ये नारायणन यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. मात्र, भारताच्या अंतराळ कार्यक्रमाबाबतचा गोपनीय दस्तऐवज दोघा शास्त्रज्ञांनी परकीयांच्या स्वाधीन केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर 1994 मध्ये प्रचंड खळबळ माजली होती. यात नंबी नारायणन यांचे नाव देखील आले होते. या प्रकरणाचा तपास प्रथम केरळ पोलिसांनी केला. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. मात्र सीबीआयला तसा कोणताही प्रकार घडला नसल्याचे आढळले होते. दरम्यान, पोलीस खात्याशी संबंधित निधीमधून ही अतिरिक्त भरपाईची रक्कम देण्यात आली आहे. यापूर्वी 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नंबी यांना 50 लाख रुपये देण्याचे आदेश दिला होता.सप्टेंबर 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने नंबी नारायणन यांना 50 लाख रुपयांची भरपाई द्यावी. तसेच या प्रकरणी सुप्रीम कोर्टातील निवृत्त न्या. डी के जैन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, असे आदेशात म्हटले होते. नारायणन यांच्यावरील कारवाईत केरळ पोलीस दलातील कोणत्या अधिकार्‍यांचा समावेश होता, त्यांचा हेतूकाय होता, या सर्व बाबींची चौकशी या समितीच्या माध्यमातून करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.