सर्वात अवजड उपग्रह जीसॅट-११ चे यशस्वी प्रक्षेपण

गुएना : वृत्तसंस्था – देशातील सर्वात अवजड जीसॅट-११ या उपग्रहाचे आज सकाळी युरोपिअन अवकाश केंद्र फ्रेंच गुएना येथून प्रक्षेपण करण्यात आले. या उपग्रहाचे वजन तब्बल ५,८५४ आहे. हा उपग्रह इतका मोठा आहे की, प्रत्येक सोलार पॅनल चार मीटरपेक्षा मोठा आहे. हा उपग्रह इंटरनेटच्या क्षेत्रात गेम चेंजर ठरेल असा दावा केला जात असून त्याचे काम सुरु झाल्यानंतर देशातील इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती होणार आहे. जीसॅट-११ च्या सहाय्याने प्रत्येत सेकंदाला १०० गीगाबाइट हून जास्त ब्रॉडबॅण्ड कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

याआधी वर्षाच्या सुरुवातीला या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने भारतीय अवकाश केंद्राने एप्रिलमध्ये याची पुन्हा तपासणी करण्यासाठी फ्रेंच गुएना येथून परत मागवले होते. जीसॅट-६अ च्या अपयशानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. एप्रिल महिन्याच्या जवळपास जीसॅट-६अ अनियंत्रित झाला होता आणि २९ मार्चला प्रक्षेपण होताच त्याचा संपर्क तुटला होता. यानंतर जीसॅट-११ चे प्रक्षेपण कऱण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अनेक निरीक्षण आणि तपासण्या केल्यानंतरच जीसॅट-११ चे प्रक्षेपण करण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला होता.