‘इस प्‍यार को क्‍या नाम दूं’ आणि ‘थपकी’ फेम एक्ट्रेस संगीता श्रीवास्‍तव यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वर्ष २०२० हे सिनेमा आणि टीव्हीसाठी सर्वात वाईट वर्ष बनत आहे. एकापाठोपाठ एक अनेक ऍक्टर्स जगाला निरोप देत आहेत . छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री संगीता श्रीवास्तव यांचे मंगळवारी मुंबईत निधन झाले. ‘इस प्यार को क्या नाम दूं’ आणि ‘थपकी प्यार की’ यासह अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम करणारी संगीता व्हॅस्कुलायटीस नावाच्या आजाराने ग्रस्त होती.

संगीता श्रीवास्तव यांना बऱ्याच दिवसांपासून मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. टीव्हीवरील ‘इस प्यार को क्या नाम दूं’ या मालिकेतून लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या संगीता टीव्ही प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय होती. त्यांच्या निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृत्यूच्या बातमीवर चाहत्यांचा विश्वासच बसत नाही.

सोशल मीडियावर युजर्स त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. मागील दिवसांत ऋषी कपूर, इरफान खान, सुशांत सिंह राजपूत, समीर शर्मा, सरोज खान, वाजिद खान यांच्या निधनातून चाहते अजून सावरू शकले नाहीत आणि संगीता श्रीवास्तव यांच्या मृत्यूच्या बातमीने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. एका अहवालानुसार, अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार्‍या संगीता श्रीवास्तव यांचे २५ ऑगस्ट रोजी सकाळी निधन झाले होते.