मुंबईच्या पोलीस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांकडून ‘समज’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई पोलीस दलातील 10 पोलीस उपायुक्तांच्या बदल्यावरून राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात दोन दिवसांपासून घमासान सुरु झाले होते. मुंबईत कोरोना संकट असतानाच या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर तीनच दिवसांत त्या सर्व बदल्या मुख्यमंत्र्यांनी रद्द करून अधिकाऱ्यांना पूर्वीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या बदल्या मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी परस्पर केल्याचे संकेत दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस आयुक्तांना समज दिल्याचे सांगितले जातंय.

या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सह्याद्री अतिथीगृहावर बोलवून घेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भावना त्यांना समजावून सांगितल्या. असे महत्त्वाचे निर्णय घेताना आवश्यक त्या सर्वांना विश्वासात घेतले पाहिजे. असे मत मुख्यमंत्र्यांचे होतं अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. बदल्या रद्द केल्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर हा राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद झाल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली होती.

मुख्यमंत्र्यांनी आपली पॉवर दाखवत राष्ट्रवादीला धोबीपछाड दिल्याचे देखील बोलले जात होतं. मात्र मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना विश्वासात न घेता एवढा मोठा निर्णय घेतला तरी कसा अशी चर्चा आता सुरु झाली आहे. बदली करण्यात आलेले सर्व अधिकारी पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी होते त्यामुळे या बदल्या करताना गृहमंत्र्यांना विश्वासत घेणे आवश्यक असतं. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज मातोश्रीवर बैठकांच सत्र पार पडलं. शरद पवार, अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत चर्चा केली. या बैठकीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना बोलावून घेत त्यांच्यासोबत चर्चा केली.