फडणवीसांनी निधी केंद्राकडे पाठवला ? IT सेलचे ‘मॅसेज’ भाजपवरच उलटले अन्…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी बहुमताच्या परीक्षेला सामोरे जाण्याआधीच राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजपच्या आयटी सेलकडून फडणवीसांच्या शपथविधीचे मेसेज व्हायरल करून समर्थन करण्यात आले. आयटी सेलच्या माध्यमातून फडणवीसांच्या 80 तासांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाचे कौतुक करण्यात आले. मात्र आयटीसेलच्या या प्रचाराने भाजपला गोत्यात आणल्याचे चित्र आहे.

राज्यातील मोठमोठ्या प्रकाल्पांच्या 40 हजार कोटी रुपयांच्या निधीचा महाविकास आघाडीचे सरकार गैरवापर करू नये यासाठी फडणवीसांनी तातडीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तसेच या 80 तासांच्या काळात फडणवीसांनी निधी केंद्राकडे परत पाठवला. फडणवीसांनी राज्याच्या भल्यासाठी हा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांचे अभिनंदन असंही म्हटले होते. हे मेसेज सोशल मीडियावर फिरत असताना भाजपचे खासदार अनंत कुमार हेगडे यांनी फडणवीसांनी निधी परत पाठवल्याचा दावा केला. यामुळे राज्यात खळबळ निर्माण झाली. यावरून शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी ही महाराष्ट्राशी गद्दारी असल्याचं म्हणत फडणवीसांवर निशाणा साधला होता. त्यामुळे फडणवीसांच्या 80 तासांच्या कार्यकाळाचे समर्थन करणारे आयटीसेल आणि हेगडे यांच्या दाव्याने भाजपच्या अडचणी वाढवल्या असल्याचे चित्र आहे.

हेगडेंचा दावा फडणवीसांनी फेटाळला
अनंतकुमार हेगडे यांचा दावा फडणवीस यांनी फेटाळून लावला आहे. ‘हे सगळं धादांत खोटं आहे. महाराष्ट्राचा एकही पैसा केंद्राला परत केलेला नाही. पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मी शेतकऱ्यांच्या मदतीच्या निर्णयाशिवाय कोणताही निर्णय घेतलेला नाही असं त्यांनी म्हटलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर फॉर्वर्ड होणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये,’ असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

… तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पायउतार व्हावंच लागेल
खासदार अनंतकुमार हेगडेंच्या सांगण्यावरुन जर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठीचे 40 हजार कोटी रुपये परत पाठवले असल्यास जनता ते कधीचं सहन करणार नाही. असे झाले असल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींना पायउतार व्हावं लागेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे. हा राज्यावरचा अन्याय असून ही आग देशभरात पसरेल आणि यावर कोणतही राज्य गप्प बसणार नाही असही नवाब मलिक म्हणाले.

Visit : policenama.com