गोव्यात आगामी विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची राष्ट्रवादीची तयारी नसल्याचे स्पष्ट

पणजी : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेस गोव्यात आगामी विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्यास तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गोवा भेटीवर असलेले पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तसे स्पष्ट संकेत देत काँग्रेस तसेच इतर समविचारी पक्षांकडे निवडणूकपूर्व युतीचा पर्याय खुला असल्याचे सांगितले. युतीबाबत बोलणी करण्याचे सर्वाधिकार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

शरद पवार हे संसदेच्या संरक्षण समितीचे सदस्य या नात्याने सध्या गोवा दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत त्यांनी संबोधित केले. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांना 2022 च्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या धोरणाबद्दल विचारले असता ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्येही काँग्रेस तसेच इतर समविचारी व निधर्मी पक्षांकडे युती व्हावी अशी इच्छा आहे. युतीचा निर्णय पक्षाच्या केंद्रीय स्तरावर घेतला जाईल. निवडणुकीच्या किमान सहा महिने आधी युतीच्याबाबतीत निर्णय जाहीर केला जाईल, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादीची महाराष्ट्रात भाजपविरोधी भूमिका आहे आणि गोव्यात पक्षाचे एकमेव असलेले आमदार चर्चिल आलेमांव हे राज्यातील भाजप सरकारला अनेक मुद्यांवर पाठिंबा देत आहेत. त्याबद्ल विचारले असता चर्चिल यांचा हा विषयाधारित पाठिंबा राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच असल्याचा आणि चर्चिल यांच्या या भूमिकेची पक्षाला कल्पना असल्याचा दावा पवार यांनी केला. केंद्र सरकारने संमत केलेल्या शेतकरीविरोधी विधेयकांबाबतही पवार यांनी परखडपणे मत मांडले ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी 50 दिवस संसदेसमोर आंदोलन केले तरी त्यांना न्याय मिळाला नाही. देशातील 65 टक्के जनता कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे आणि केंद्रातील भाजप सरकार शेतक-यांच्या मुळावर उठले आहे.