धक्कादायक ! निवडणुकीसाठी आयटी कंपनीने चोरला ७.८ कोटी लोकांचा आधार डेटा

हैदराबाद : वृत्तसंस्था – ‘सेवामित्र’ या तेलुगू देशम पक्षाच्या (टीडीपी) ॲपसाठी आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील ७.८ कोटी लोकांचा आधार डेटा एका आयटी कंपनीने चोरला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन्ही राज्यातील एकूण लोकसंख्या जवळपास ८. ४ कोटी आहे. याप्रकरणी माधापूर पोलीस ठाण्यात आधार कायदा २०१६ वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंध्र प्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तेलुगू देशम पक्षाने ‘सेवामित्र’ हे नवीन ॲप सुरु केलं आहे. या ॲपचा करार आयटी ग्रिड्स (इंडिया) या आयटी कंपनीसोबत झाला असून या आयटी कंपनीने ७.८ कोटी लोकांचा डेटा चोरला असल्याची माहिती समोर आली आहे. स्टेट डेटा डिपॉझिटरीतून हा डेटा चोरण्यात आला आहे. या आयटी कंपनीच्या हार्ड डिस्क तपासल्यानंतर सेवामित्र ॲपच्या रिमुव्हेबल स्टोरेजमध्ये हा डेटा ठेवला असल्याचं स्पष्ट झालं. या डेटाचे स्वरूप युआयडीएआय सारखेच आहे.

युआयडीएआयने दिलेल्या तक्रारीनंतर हैदराबादमधील सायबराबाद पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कंपनी आयटी ग्रिड्स (इंडिया) विरोधात लोकांच्या आधार कार्डची माहिती बेकायदेशीरपणे आपल्याकडे ठेल्याप्रकरणी आधार कायदा २०१६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

टीडीपीचे स्पष्टीकरण –

दरम्यान, टीडीपीने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले असून कोणत्याही प्रकारची गोपनीय माहिती चोरली नसल्याचे सांगितले आहे. आधार डेटाची कच्ची माहिती आपल्याकडे नसून, कल्याणकारी योजनांच्या लाभार्थींची माहिती मिळवण्यासाठी वापर केला जात होती. असे स्पष्टीकरण टीडीपीने दिले आहे.