Pune : IT अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या

वाकड/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हिंजवडीतील आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका अभियंत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना आज (गुरुवार) दुपारी दोनच्या सुमारास वाकड येथे घडली आहे. प्रशांत नरेंद्र सेठ (वय-32 रा. कॅप्रेसिया सोसायटी, वाकड) असे आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रशांत सेठ हा हिंजवडी येथील टाटा टेक्नॉलॉजी या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करत होता. तो मुळचा मध्य प्रदेशातील इंदोरचा रहिवाशी असून वाकड येथील कॅप्रेसिया सोसायटीत मागील अनेक वर्षापासून रहात होते. गुरुवारी दुपारी त्यांनी राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पचंनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी औंध उरो रुग्णालयात पाठवून दिला आहे.

प्रशांत सेठ यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेतली असून या चिठ्ठीमध्ये आपण स्वत:हून आत्महत्या करीत असून, आपल्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये असे म्हटले आहे.