उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे अतिशय गरजेचे ; बदलत्या जीवनशैली मुळे प्रमाण वाढते

पोलीसनामा ऑनलाईन टीम – रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे अतिशय गरजेचे आहे. अन्यथा अनेक धोके त्यामुळे निर्माण होतात. हृदयविकार, मेंदूत रक्तस्त्राव होऊन अर्धांगवायूचा झटका येणे, मूत्रपिंड निकामी होणे, दृष्टिपटलावर रक्तस्त्राव होऊन अंधत्व येणे असे अनेक गंभीर परिणाम रक्तदाबावर नियंत्रण न ठेवल्यास होऊ शकतात. उच्च रक्तदाबाच्या विकाराचं निदान झाल्यावर त्यासाठी असलेले शास्त्रीय उपचार कायमस्वरूपी घेतले पाहिजेत. उच्च रक्तदाबाचा त्रास होण्यास भारतीयांची जनुकीय परिस्थिती कारणीभूत आहे, असे तज्ज्ञ सांगतात. याबाबत फारसे काही करणे आपल्या हातात नसले तरी जीवनशैलीतील दोष टाळणे आणि नियंत्रण ठेवणे हे आपल्या हातात आहे.

बदललेल्या जीवनशैलीमुळे उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत चालले आहे. भारतात हा आजार सतत वाढत असल्याचे विविध सर्वेक्षणांतून दिसून आले आहे. ‘पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्स’ने यासंदर्भातील महाराष्ट्राचा एक संशोधन अहवाल प्रकाशित केला आहे. राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये घरोघर जाऊन हा सॅम्पल सर्व्हे केला गेला. यात सर्व प्रकारच्या व्यक्तींची माहिती घेण्यात आली असता रक्तदाबाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. वयाची पंचविशी पार केलेल्या महाराष्ट्रीय व्यक्तींपैकी २५ टक्के व्यक्ती उच्च रक्तदाबाने पीडित आहेत. हे प्रमाण मुंबई, पुणे, नाशिक आणि अमरावती या शहरांमध्ये ३० टक्क्यांच्या जवळपास आहे. थोडे मागास असलेले धुळे, गडचिरोली या जिल्ह्यात तुलनात्मकदृष्ट्या हे प्रमाण कमी आहे. याचा अर्थ अधिक प्रगत विभागात उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक आहे. राज्यात ज्येष्ठ नागरिकांमध्ये ४० टक्के व्यक्ती उच्च रक्तदाबाने त्रस्त आहेत.

अविवाहित व्यक्तींमध्ये १५.९ टक्के, विवाहितांमध्ये २५.५ तर अविवाहित, विभक्त आणि विधवा-विधुरांमध्ये ३७ टक्के आहे. एकूणातील मराठी स्त्री-पुरुषांमध्ये पुरुषांना रक्तदाबाचा त्रास असण्याचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरोग्यखात्याने सुमारे ६० लाख व्यक्तींची तपासणी केली असता त्यांना रक्तदाबाचा विकार आढळला, त्यापैकी तब्बल २२ टक्के रुग्ण, पुन्हा तपासणीला येत नाहीत आणि औषधंही घेत नाहीत असे आढळले. आरोग्यदृष्ट्या असलेले अज्ञान, आरोग्याबाबत जागरूकतेचा अभाव आणि उच्च रक्तदाबाबाबतचे गैरसमज यामुळेच हीच परिस्थिती निर्माण झाली आहे.