जनतेला अन्न,वस्त्र व नोकरी देणं ही देवाची जबाबदारी; भाजपच्या ‘या’ मंत्र्याचं वादग्रस्त विधान

पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय जनता पार्टीचे नेते बेताल वक्तव्य करण्यात माहीर आहेत. लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतांना, पुन्हा एकदा भाजपचे केंद्रिय मंत्री महेश शर्मा यांनी आयोजीत केलेल्या एका सभेत वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, जनतेसाठी अन्न, वस्त्र व नोकरी देण्याची जबाबदारी ही देवाची आहे. जनतेच्या गरजा पूर्ण करणे हे देवाला देखील जमले नाही, तर खासदार काय करणार असा सवाल करत त्यांनी हे व्यक्तव्य केले.

महेश शर्मा हे गौतमनगर मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत. शर्मा यांनी जे वादग्रस्त विधान केले आहे ते १४ मार्च रोजी झालेल्या सभेतील असून, त्याचा व्हिडीओ मात्र, आता व्हायरल होतांना दिसत आहे. बुलंदशहर येथील भजनलाल मंदीर येथे घेण्यात आलेलेल्या सभेत नागरिकांशी संवाद साधतांना ते म्हणाले की, खासदार काही जनतेच्या गरजा पूर्ण करु शकत नाही. तुमच्या आणि माझ्यापेक्षा देवच जास्त वेडा आहे. कारण देवाने जर आपल्याला या भूतलावर पाठवले आहे तर अन्न ,वस्त्र व नोकरी देणे ही देखील त्याचीच जबाबदारी आहे.

महेश शर्मा म्हणाले की, पूर्व उत्तरप्रदेशात असणाऱ्या बालियासारख्या जिल्ह्यात व इतर जिल्ह्यातील जनतेला योग्य त्या प्रमाणात अन्नधान्य मिळत नाही. आजही मुले जेव्हा शाळेत जातात तेव्हा शालेय पोषण आहाराअंर्तगत मिळणाऱ्या जेवणावर ते आपले पोट भरतात तर बाकी मुले ही उपाशीच राहतात. जर देवाने आपली निर्मिती केली असेल तर देवच आपल्या गरजा पूर्ण करेल. यात एकटा खासदार काय करणार, असे म्हणत शर्मा यांनी निवडणूकीच्या तोंडावर पून्हा भाजपाला अडचणीत टाकले आहे.