‘काँग्रेसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण न देणं चुकीच’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी काँग्रेसला निमंत्रण दिलं नाही हे चुकीचं आहे असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी केलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आज दुपारी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आघाडीची बैठक झाली. या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना अहमद पटेल म्हणाले की, “सर्वात आधी राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी भाजपला निमंत्रण दिलं. सत्ता स्थापनेत भाजप अयशस्वी ठरल्यानंतर दुसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं. शिवसेना सत्ता स्थापनेत अयशस्वी ठरल्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं होतं. यानंतर आज दुपारी राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. त्यांना मंजुरीही देण्यात आली. दरम्यान सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला राज्यपालांनी कोणतंही निमंत्रण दिलं नाही हे चुकीचं आहे.” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

पुढे बोलताना ते म्हणाले, “काल पहिल्यांदाच शिवसेनेनं पाठिंब्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीला संपर्क साधला. परंतु काही गोष्टींवर चर्चा होणं आणि त्यांचं स्पष्टीकरण मिळणं गरजेचं आहे. समान कार्यक्रमासह अनेक मुद्द्यांवर चर्चा होणं गरजेचं आहे. आघाडीने एकत्र निवडणूक लढवली आहे. त्यामुळे चर्चा करून आपापसात निर्णय घेऊ. तूर्तास कोणताही निर्णय झालेला नाही.” असं अहमद पटेल यांनी स्पष्ट केलं.

Visit : Policenama.com