‘सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही’, काँग्रेस नेत्याकडून आणखी एक ट्विट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यातील महाविकास आघाडीतील कुरबुर पुन्हा एकदा बाहेर आली आहे. राज्य सरकारने अलीकडेच सुरु केलेल्या महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरुन काँग्रेस नाराज झाली आहे. या पोर्टलच्या जाहिरातीत केवळ शिवसेना व राष्ट्रवादीच्या मंत्रांच्याच फोटोंना स्थान देण्यात आल्यानं ‘ही योजना महाविकास आघाडी सरकारची आहे की, शिवसेना-राष्ट्रवादीची ? असा सवाल युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ट्विट करत विचारला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा सत्यजित तांबे यांनी ट्विट केलं आहे.

पहिल्या ट्विटमध्ये सत्यजित तांबे यांनी म्हणाले की, ‘महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे की, शिवसेना-राष्ट्रवादीची? आघाडीचे गठन होत असताना ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही ? हा माझ्या सारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे, अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.

त्यानंतर शिवसेना नेते सुभाष देसाई आणि राष्ट्रवादीतील मंत्र्यांनी बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधून चूक काबुल केली आहे. त्यामुळे, हा प्रश्न आता संपला असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं. तथापि, सत्यजित तांबे यांनी अजून एक ट्विट करुन आपला हेतूच बोलून दाखवला आहे.

सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही
मेरी कोशिक है कि ये सूरत बदलनी चाहिए

यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूलमंत्री बाळासाहेब यांच्यादरम्यान १ तास चर्चा झाली होती. काँग्रेसचे काही मंत्री नाराज असल्याची चर्चा होती, तेव्हा बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली होती. पण, या चर्चेत ठरलेल्या गोष्टी प्रत्यक्षात घडताना दिसत नसल्यान अशी नाराजी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर आता बाळासाहेब थोरात यांचे भाच्चे आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी जाहीरपणे सरकाविरोधात नाराजीचा सूर व्यक्त केला आहे.