मोदींच्या येण्यामुळे आयटीयन्सची वेळेआधीच कल्टी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आधीच ट्राफिक जाम च्या समस्येला वैतागलेल्या आयटीयन्सनी आपल्या नेहमीच्या वेळेपेक्षा आधीच निघणे पसंत केले आहे. आज पूर्ण शहरात सुरक्षा  तसेच वाहतूक  व्यवस्थेच्या दृष्टीने मोठा बंदबस्त ठेवण्यात आला आहे.

ज्या ठिकाणी आज पंतप्रधान मोदी येणार आहेत त्याच रस्त्यावरून हिंजवडी आयटीपार्क तसेच पिंपरी चिंचवड, विमाननगर  येथील आयटी कंपन्यांचा मुख्य मार्ग आहे. आज सायंकाळी ४. ३० वाजता पंतप्रधान मोदी बालेवाडी येथे येणार आहेत. ४. ३० ते जवळपास ७ वाजेपर्यंत मोदी पुण्यात आहेत. याच वेळेत आयटी कंपन्या सुटण्याची तसेच शिफ्ट बदलण्याची वेळ असते. त्यामुळे  वाहतूक कोंडी टाळण्याकरिता ऑफिसला लवकर जाणे आणि लवकर घरी येणे पसंत केले.

दरम्यान, बालेवाडीतील होणाऱ्या या कार्यक्रमानिमित्त पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी दुपारी घटनास्थळ आणि सुरक्षा व्यवसस्थेची पाहणी केली.

याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, आमदार विजय काळे, संग्राम थोपटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, स्थानिक नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.