आयटीच्या विद्यार्थ्याची हॉस्टेलमध्ये आत्महत्या

फोंडा : पोलीसनामा ऑनलाईन – फर्मागुढी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रतीक तुळशीदास नाईक (वय-२३) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो जुनसवाडा-मांद्रे येथील रहिवाशी असून त्याच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे.

प्रतीक हा गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयात आयटी विभागाच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. फर्मागुढी येथील हॉस्टेलमध्येच तो रहायचा. प्रतीक गुरुवारी सकाळी वर्गात न आल्याने तसेच दुपारपर्यंत कुठेच न दिसल्याने त्याच्या मित्रांनी ही बाब महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सांगितली. हॉस्टेलमधील प्रतीक याची खोलीही बंद होती.त्यानंतर लगेच पोलिसांना कळवण्यात आले. खोलीची कडी तोडून त्यांनी आत प्रवेश केला असता प्रतीक गळफास लावलेल्या स्थितीत आढळला.

प्राचार्यांनी प्रतीकच्या कुटुंबियांना व फोंडा पोलिसांना कळवले. महाविद्यालयात बुधवारी झालेल्या कार्यक्रमातही त्याने भाग घेतला होता. मात्र, हॉस्टेलवर परतल्यानंतरच त्याने हा निर्णय घेतला असावा, असा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक रिफा बार्रेटो यानी पंचनामा केला. पोलिस अधिक तपास करीत आहेत.