नितेश राणे यांची अनिल परब यांच्यावर बोचरी टीका, म्हणाले – ‘हे परिवहनमंत्री आहेत की परिवारमंत्री ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शुक्रवारी (दि. 5) विधानसभेत झालेल्या चर्चेत भाजपा आमदार नितेश राणे यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सभागृहात राज्य सरकारच्या कारभारावर टीका करताना राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, अध्यक्ष महोदय, राज्याला एक परिवहनमंत्री द्या, राज्याला परिवहन मंत्री नाही. आहेत ते परिवार मंत्री बनले असून ते कलानगरच्या अवतीभवती घुटमळत असतात. त्यांनी कलानगरच्या बाहेर पडावे, मंत्रालय आहे, एसटी कामगार आहेत, त्यांचा पगार आहे, त्यात लक्ष घाला, असा सल्ला राणे यांनी परब यांना दिला.

राणे म्हणाले की, अर्थसंकल्पातून जास्त अपेक्षा ठेवू नका, राज्यासमोर आर्थिक संकट आहे असे सरकार सांगत आहे. पण हे आर्थिक संकट केवळ शेतकरी आणि कामगारांसांठीच आहे का. पण सरकारमध्ये बसलेले लोक राजरोसपणे लूट, भ्रष्टाचार करत आहेत. त्याबाबतही विचार झाला पाहिजे. कारण हे आर्थिक संकट केवळ सामान्य लोकांसाठी आहे. सरकारकडून राजरोसपणे भ्रष्टाचार सुरू आहे. त्याबाबत कुणी बोलत नाही. सरदेसाईंसारख्या व्यक्तींना सरकार का पाठिंबा देत आहे. ते मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत राजरोजपणे का फिरतात. ते कंत्राटदारांना फोन का करतात. त्यांना वाय दर्जाची सुरक्षा का दिली जात आहे, असा सवालही राणेंनी यावेळी उपस्थित केला आहे.