इंदिरा गांधी – करीम लाला भेटीबद्दल फडणवीसांनी काँग्रेसला विचारले ‘हे’ प्रश्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करिम लाला यांच्यात भेट होत असल्याचे विधान केले होते. या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांनी केलेल्या दाव्याचा आधार घेत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवसेना ही महाराष्ट्रात काँग्रेसची सहयोगी पार्टी असून शिवसेनेच्या नेत्यानेच हा धक्कादायक खुलासा केला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

स्वर्गीय इंदिरा गांधी या मुंबईतल्या पायधुणीमध्ये अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांना भेटायला येत होत्या. यातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. काँग्रेस पक्षानं हे खरं आहे का ते सांगावं असे आव्हानच देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला दिली आहे. करीम लालासारख्या अंडरवर्ल्ड डॉनला भेटण्यासाठी इंदिरा गांधी येत होत्या का ? जर अशा प्रकारची भेट होत होती, तर काँग्रेस पार्टी अशा प्रकारच्या अंडरवर्ल्डच्या भरवशावर निवडणुका जिंकत होती का ? काँग्रेस पार्टीला अंडरवर्ल्ड फायनान्स करत होता का ? काँग्रेस पार्टी अंडरवर्ल्डच्या मसलपॉवर वर या ठिकाणी निवडणुका जिंकत होती का ? असे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत.

काँग्रेस पक्ष यासंदर्भात खुलासा करणार आहे का ? महाराष्ट्रात जे राजकारणाचं गुन्हेगारीकरण सुरु झालं, त्याची सुरुवात त्याच काळापासून झाली का ? महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेला याची उत्तर पाहिजेत. काँग्रेस पार्टी इतकी लालची झाली आहे की आता त्यांच्या शीर्षस्थ नेत्यांवर टीका झाल्यानंतरही त्यांच्याकडून कोणीही अधिकृतरीत्या मोठी व्यक्ती बोलायला तयार नाही. कोणी याचा निषेध करायला तयार नाही, खुलासा करायला तयार नाही. पण महाराष्ट्र आणि देशाला या प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजेत, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. यावर आता काँग्रेस काय उत्तर देते हे पाहावे लागेल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like