दिल्लीतील भाजप नेत्यांनीच फडणवीस यांचा काटा काढला; खासदार राऊत यांचा गौप्यस्फोट

चिपळूण : पोलीसनामा ऑनलाइन –   दिल्लीतील भाजप नेत्यांनीच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी नको होते. त्यांना मी पणाचा जो गर्व चढला होता आणि दिल्लीत नेतृत्वाची स्वप्ने पडत होती. त्यामुळेच दिल्लीतील नेत्यांनीच त्यांचा काटा काढल्याचा गौप्यस्फोट खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. भाजपमधील फडणवीस पुरस्कृत टवाळखोरांची विकृतबुद्धी महाराष्ट्र आणि राज्य सरकारची बदनामी करत आहे. सत्ता हातातून गेल्याने त्यांचा जळफळाट झाल्याने ते असे विकृत चाळे करत असल्याची टीकाही खा. राऊत यांनी केली आहे.

खा. राऊत म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. कोविडसारख्या संकटात महाविकास आघाडी सरकारने अतिशय उत्तम काम केले. राज्यात जी आरोग्य व्यवस्था उभारली गेली आणि कोविडवर नियंत्रण मिळवले गेले. त्याची दखल जगाने घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या कामाचे कौतुक केले आहे. कोविड काळात राज्याची आर्थिक घडी विस्कटली असली तरी ठाकरे सरकारने त्यातून मार्ग काढत राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी चांगले प्रयत्न केले आहेत. लवकरच राज्य पूर्वपदावर येईल, असेही ते म्हणाले.

राणेंच्या बकवासगिरीला कवडीचीही किंमत देत नाही

नारायण राणे यांनी महाराष्ट्र सरकार लवकरच कोसळेल, असे वक्तव्य केले होते. त्याचा समाचार घेताना खासदार राऊत म्हणाले की, नारायण राणे नेहमीच अशी भविष्यवाणी करत असतात. गेली कित्येक वर्षं आम्ही ऐकतोय. सरकार पडेल असे ते नेहमीच बोलत असतात. मात्र, सरकार पडत नाही. परंतु नारायण राणे नेहमीच पडत असतात. त्यामुळे त्यांच्या या बकवासगिरीला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही. देवेंद्र फडणवीसांना खूश करण्यासाठी आणि आपले अस्तित्व जपण्यासाठी ते राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोटेनाटे आरोप करत आहेत.