‘त्या’ 3 तरूणांची आत्महत्या की हत्या ?

कसारा : पोलिसनामा ऑनलाईन – झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अमावस्येच्या रात्री गायब झालेल्या तिघांनी अघोरी विद्येमुळे आत्महत्या केल्याच्या चर्चेला आत पूर्णविराम दिला आहे मृत तरुणाचे वडील रमेश घनवट यांनी माझ्या मुलासह तिघांची आत्महत्या नसून त्यांची हत्याच झाल्याचा संशय आहे. आमच्या मुलांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यास पोलीस दिरंगाई करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे.

माझा मुलगा मुकेश व त्याच्यासोबत असलेले अन्य दोन जण हे नातेवाईक आहेत. तिघेही शिक्षित तरुण होते. त्यांचे मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने त्यांनी आत्महत्या केली, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. परंतु, आत्महत्या करताना कोणी सूट कसा घालेल. बूट घालून उंच झाडावर कसा जाईल, असे सवाल रमेश यांनी उपस्थित केले आहेत. पोलिसांनी योग्य तपास करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणीही केली आहे.

आम्ही काही संशयीतांची नावे पोलिसांना सांगितली आहेत मात्र त्यांच्याकडे चौकशी करून त्यांना अटक करण्या ऐवजी पोलीस त्यांना मोकळीक देत असल्यामुळे तपास भरकटत असल्याचा आरोप घावट यांनी केला आहे. या घटनेमुळेपोलिस यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सर्व बाजूनी तपास सुरु
पोलीस यंत्रणा सर्व बाजूने तपास करीत आहे. मृत तरुणांच्या नातेवाइकांना आम्ही पूर्णपणे सहकार्य करू. त्यांच्याकडेही काही माहिती असेल, तर त्यांनीही आम्हाला मदत करावी. आम्ही योग्य तो तपास करून पीडित कुटुंबास न्याय देऊ.असे शहापूरचे उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे यांनी सांगितले.