‘त्या’ व्हिडीओशी भाजपचा संबंध नाही, पक्षाला जाब विचारणं चुकीचं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकामुळे वाद निर्माण झाला होता. हा वाद शमला असतानाच तानाजी चित्रपटातील दृष्ये वापरून व्हायरल झालेल्या व्हिडीओचा वाद सुरु झाला आहे. यावर छत्रपती संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला होता. तसेच संबंधीत पक्षालाही त्यांनी सुनावले होते. त्यानंतर भाजपने या व्हिडीओचा पक्षाशी काहीही संबंध नसल्याचे जाहीर केले आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तसे पत्र जाहीर केले आहे.

पुस्तक झालं आता व्हिडीओ आला ! अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय, अशा शब्दांत संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या नरेंद्र मोदींच्या तुलनेबाबतच्या व्हिडीओवर संताप व्यक्त केला होता. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांची प्रचाराची जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र, दिल्लीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पॉलिटीकल कीडा या ट्विटर हँडलवरून तानाजी चित्रपटातील दृष्यांना मॉर्फिंग करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान मोदी तर तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. याबाबत भाजपने स्पष्टीकरण दिले आहे.

तानाजी चित्रपटाच्या दृश्यांचा वापर केलेला एक व्हिडिओ कोण्या पॉलिटीकल कीडा नावाच्या ट्वीटर हँडलवरून पोस्ट करण्यात आला असला तरी त्याच्याशी भारतीय जनता पार्टीचा संबंध नाही. भाजप त्या व्हिडीओचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत वापरही करत नाही. भाजप या व्हिडीओचा निषेध करत आहे. या व्हिडीओवरून भाजपला जाब विचारणे अत्यंत चुकीचे आणि खोडसाळपणाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, हा व्हिडीओ ज्या पॉलिटीकल कीडा ट्विटवरून व्हायरल करण्यात आला होता. तो व्हिडीओ ट्विटरवरून काढून टाकण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –