शिवसेना – भाजप पुन्हा एकत्र येतील, शिवसेनेच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याच्या दाव्याने खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निकालानंतर भाजप आणि शिवसेनेत कटुता निर्माण झाली. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन केले. तीस वर्षाची साथ सोडून शिवसेनेने कायम विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. त्यामुळे भाजपला मोठा हादरा बसला. नवं सरकार स्थापन होऊन 15 दिवसही झालेले नसतानाच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी एक दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

मनोहर जोशी यांनी केलेल्या दाव्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मनोहर जोशी म्हणाले, काही लहान-सहान गोष्टीमुळे भाजप आणि शिवसेनेत दुरावा निर्माण झालाय. मात्र तो दुरावा दोघांच्याही फायद्याचा नाही. दोनही पक्ष आता वेगळे झाले तरी ते पुन्हा एकत्र येणारच नाहीत असं नाही, असे मनोहर जोशी यांनी म्हटले आहे. ते एकत्र येवू शकतात. त्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे योग्यवेळी निर्णय घेतील असं मतही त्यांनी व्यक्त केले.

मनोहर जोशी पुढे म्हणाले, राज्याच्या भल्यासाठी थोडा त्याग केला पाहिजे. आपल्याला जे वाटतं तसच घडेल असं नाही. त्यासाठी सगळ्यांनीच दोन पावले मागे यावं असंही त्यांनी सूचवलं. मनोहर जोशी यांच्या या दाव्यामुळे राजकारणात नवीन चर्चा सुरु झाली आहे. आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ती पक्षाचं सरकार चलवणं हे आव्हान असल्याचे म्हटलं होतं. त्यातच 13 दिवसानंतरही खाते वाटप झालं नसल्यामुळे नाराजीही व्यक्त होतेय. या पार्श्वभूमीवर मनोहर जोशी यांच्या या दाव्याला महत्व प्राप्त झाले आहे.

Visit : Policenama.com