‘हा’ विश्वचषक भारतीय संघासासाठी आव्हानात्मक : विराट कोहली

विश्वचषकासाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई : वृत्तसंस्था – हा विश्वचषक माझ्यासाठी तसेच भारतीय संघासाठी खूप आव्हानात्मक असेल, असं मत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले आहे. भारतीय संघ इंग्लंडला जाण्याआधी मुंबई येथे घेण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत तो बोलत होता. यावेळी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री उपस्थित होते. विराट म्हणाला की, सगळेच संघ तोडीसतोड आहेत, अशा वेळी प्रत्येक सामना जिंकण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल.

इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक २०१९ साठी भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली उद्या पहाटे रवाना होणार आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली हा तिसरा विश्वचषक खेळला जाणार आहे. ३० मे पासून ते १४ जुलै पर्यंत म्हणजे जवळ जवळ दीड महिने विश्वचषकातील सामने खेळले जाणार आहेत. विराट म्हणाला की, आमचे सगळे वेगवान गोलंदाज फिट आहेत आणि चांगली कामगिरी करण्यासठी उत्सुक आहेत. या विश्वचषकात आम्हाला कोणत्याही गोष्टीला कमी लेखून चालणार नाही. मधल्या फळीतील फलंदाज केदार जाधव आता पूर्णपणे फिट आहे.

प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले कि, सर्वच संघ हे तुल्यबळ आहेत, अशावेळी आम्हाला आमच्या कामगिरीत सातत्य ठेवावे लागेल. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची महत्वाची भूमिका असेल. अशा स्वरूपातील सामने खेळण्यासाठी धोनी उत्तम खेळाडू आहे. आम्ही आमच्या पूर्ण क्षमतेने खेळलो तर आम्ही नक्की हा विश्वचषक जिंकू, असा आशावाद शास्त्री यांनी व्यक्त केला.

विश्वचषकासासाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, विजय शंकर, एमएस धोनी (विकेटकीपर), केदार जाधव, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, मो. शमी, रवींद्र जडेजा.