Coronavirus : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यात अयशस्वी ? ‘या’ देशात पंतप्रधानांची काही तास चौकशी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी योग्य वेळी योग्य ती पावले उचलली गेली नाहीत, असा आरोप बऱ्याच देशांतील स्थानिक सरकारवर होत आहे. पण इटलीमध्ये हे प्रकरण इतके गंभीर झाले आहे की, पंतप्रधानांनाही चौकशीचा सामना करावा लागला. दरम्यान इटलीमध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 34 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 6 कोटी लोकसंख्या असलेल्या इटलीमधील कोरोनाने संक्रमित झालेल्यांची एकूण संख्या 2.36 लाखांपेक्षा जास्त आहे. लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यास त्यांनी उशीर केला का ? ज्यामुळे देशात कोरोनाची प्रकरणे वाढली, असा प्रश्न सरकारवर उपस्थित होत आहे.

माहितीनुसार, इटलीतील बर्गामोला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. बर्गामोच्या प्रॉसिक्युटरने शुक्रवारी इटलीचे पंतप्रधान गिउसेप्पे कॉन्टे यांची सुमारे 3 तास चौकशी केली. वेळेत लॉकडाउन का केले गेले नाही, याचा तपास ते करत आहेत. ज्यामुळे शहरे मोठ्या प्रमाणात उध्वस्त झाली. दरम्यान, अहवालात म्हटले कि, पंतप्रधानांची रोममध्ये त्यांच्या कार्यालयात साक्षीदार म्हणून चौकशी केली गेली. सध्या पंतप्रधानांविरोधात कोणताही गुन्हेगारी तपास सुरू केलेला नाही.

इटलीचे गृहमंत्री लुसियाना लॅमोर्गीज आणि आरोग्यमंत्री रॉबर्टो स्प्रान्झा यांचीही चौकशी करण्यात आली आहे. यापूर्वी पंतप्रधान गिउसेप्पे कॉन्टे यांनी स्थानिक माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, तपास यंत्रणांना सर्व बारीक माहिती पुरवायची आहे. ते म्हणाले की, त्यांची देखील चौकशी होत आहे, याबाबत त्यांना चिंता वाटत नाही.

बर्गामो इटलीच्या लोंबार्डी भागात आहे, जेथे गिउसेप्पे कॉन्टे यांचा विरोधी-लीग पक्ष सत्तेत आहे. लीग पक्षाचे नेते मत्तेओ साल्विनी यांनी एका ट्विटमध्ये पंतप्रधानांवर टीका केली आहे. मॅटिओ साल्विनी यांनी ट्वीट केले की, बर्गामोला रेड झोन घोषित करून सील न करण्याचा निर्णय रोमने घेतला होता. आता पंतप्रधान गिउसेप्पे कॉन्टे यांनी कमीतकमी मृतांच्या नातेवाईकांची क्षमा मागितली पाहिजे.