चिंताजनक ! इटलीत 11 फुटबॉलपटूंना कोरोनाची ‘लागण’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – 100 पेक्षा जास्त देशात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. काही खेळाडूंना देखील कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. चीन पाठोपाठ इटलीमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. अशात आता इटलीतून धक्कादायक बातमी येत आहे की इटलीतील फुटबॉल लीग सेरी – ए च्या 11 खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी झाली होती आणि त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

इटलीतील लीग स्पर्धेत 20 संघ खेळतात. या स्पर्धेतील 11 खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. इटलीच्या आरोग्य विभागाने आदेश काढले असून सर्व खेळाडूंवर सराव करण्यासाठी बंदी आणली आहे. तसेच त्यांना घरी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सीरी-ए च्या डॉक्टरांनी स्पर्धेतील सर्व सराव रद्द करण्यात सांगितले आहे. अन्य खेळाडूंना कोरोना होऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात आली आहे. लीगमध्ये खेळणाऱ्या युसी सांपडोरिया क्लबच्या सात खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर फिओरेंटीनाच्या चार खेळाडूंना कोरोना झाल्याचे चाचणीतून उघड झाले.

स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो आणि लियोनेल मेसी यांनी सर्व स्पर्धा आणि सराव सत्रातून माघार घेत घरी राहण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन दिवसात जगभरातील 6 खेळांच्या 14 स्पर्धा रद्द केल्या आहेत. तर स्विझर्लंडमध्ये 19 – 24 एप्रिल दरम्यान होणारी वर्ल्ड स्पोटर्स अ‍ॅण्ड बिझनेस समिती रद्द करण्यात आली आहे.

फुटबॉलपटूंच्या आधी अमेरिकेतील एनबीएमधील तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. सुपर लीग ग्रीसमधील एका फुटबॉल क्लबच्या मालक वेंगेलिस मारिनकिस यांना देखील कोरोना झाल्याचे वृत्त आहे. जगभरातील 153 देशात कोरोनाचे 1 लाख 56 हजार 932 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 5 हजार 839 जणांचा मृत्यू झाला आहे.