आता ITI मधील शिक्षक व कर्मचार्‍यांना ‘चॉईस’ पोस्टींग मिळणार : मंत्री नवाब मलिक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन : राज्याच्या कौशल्य विकास विभागाने आयटीआयमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांना त्यांच्या इच्छेनुसार बदली देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना दहा जागांचे पर्याय देण्यात येतील, त्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार ऑनलाईन पद्धतीने बदल्या केल्या जातील. अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत यांनी दिली.

नवाब मलिक यांनीं दिलेल्या माहितीनुसार, कौशल्य व विकास विभागाच्या अंतर्गत राज्यातील 417 आयटीआय आहेत. ज्यात सहा हजार कर्मचारी व शिक्षक आहेत. या कर्मचाऱ्यांच्या घरगुती तर कधी वैयक्तिक कारणांमुळे जिल्हा किंवा घराच्या जवळ बदल्या हव्या असतात. तसेच कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी आमदार-खासदार व राजकीय लोकांचीदेखील अनेक शिफारसपत्रे येतात. त्यामुळे आता आयटीआयमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवडीनुसार बदली देण्यात येणार असून यासाठी त्यांच्याकडून बदलीचे दहा पर्याय मागवण्यात येतील. या माध्यमातून 2020-21 पासून सर्व प्रकारच्या बदल्या फक्त ऑनलाईन पद्धतीनेच केल्या जाणार आहेत.

याआधी राज्यात ग्रामविकास विभागाने ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविली होती. सध्या बदल्यांसाठी सुमारे 700 अर्ज आले असून या बदल्या ऑनलाईन पद्धतीने केल्या जातील, असे देखील नवाब मलिक यांनी सांगितले. या ऑनलाईन पद्धतीने केल्या जाणाऱ्या बदल्यांसाठी https://hrms.dvet.gov.in/ हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.