‘त्या’ निर्णयासाठी कुलभूषण जाधववर PAK नं आणला दबाव, भारताचा आरोप

पोलिसनामा ऑनलाईन –पाकिस्तानमध्ये तथाकथित हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिल्याची माहिती पाकिस्तानकडून देण्यात आली होती. त्यांना दुसरा कॉन्सुलर अ‍ॅक्सेस देण्याचा प्रस्तावही दिल्याचे पाकिस्तानने म्हटले होते. परंतु पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्यावर दबाव आणत तो निर्णय घेण्यास भाग पाडल्याचा आरोप भारताने केला आहे.

प्रकरणातील एफआयआर, पुरावे, न्यायालयाच्या आदेशासह कोणतीही संबंधित कागदपत्रे भारताला देण्यास पाकिस्तानने नकार दिला. जाधव प्रकरणात पाकिस्तान आयसीजेच्या निर्णयाचे पालन करण्याचा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जाधव यांना वाचवण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित भारतात परत आणण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करेल, असं परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय न्याय कायद्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा अधिकार जाधव यांना नाकारण्यास पाकिस्तानने भाग पाडले आहे, असा दावा परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आला. पाकिस्तान ढोंगीपणा करत असून त्यांच्या दबावामुळेच कुलभूषण जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिला, असेही त्यांनी म्हटले आहे.