Pune News : सरपंचपदी निवडीनंतर नोटांचा पाऊस अन् JCB ने गुलालाची उधळण, मिरवणुकीची ‘सोशल’वर तुफान चर्चा

खेड : पोलीसनामा ऑनलाइन – सरपंचपदाची निवडणूक झाल्यानंतर उत्साही कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढून क्रेनच्या साह्याने नवनिर्वाचित सरपंच- उपसरपंचांना हार घालत जेसीबीने गुलाल अन् भंडाऱ्याची उधळण केली. एका कार्यकर्त्याने तर कहर म्हणजे मिरवणुकीत चक्क नोटाचे बंडले काढून पैशाचा पाऊसच पाडला. खेड तालुक्यातील या दावडी गावात घडलेल्या हा प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

13 सदस्य संख्या असलेल्या दावडी ग्रामपंचायतीची नुकतीच निवडणुक झाली. सरपंच पद हे सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असल्याने सरपंच पदासाठी संभाजी घारे यांचा एकमेव अर्ज तर उपसरपंच पदासाठी राहुल कदम यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. यावेळी श्री महालक्ष्मी ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे फक्त आठच सदस्य हजर होते. त्यामुळे सरपंच संभाजी घारे तर उपसरपंच राहुल कदम यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सिताराम तुरे यांनी काम पाहिले. यावेळी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांनी गावचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असणार आहे असे सांगितले.

यावेळी नवनिर्वाचित सदस्या राणीताई डुंबरे, माधुरी खेसे, पुष्पा होरे, धनश्री कान्हुरकर, अनिल नेटके, संतोष सातपुते हजर होते. यावेळी पिंपरीचे माजी महापौर राहुल जाधव, जिल्हापरिषद सदस्य अतुल देशमुख, मयुर मोहिते, विजयसिंह शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.