‘…त्यामुळे हा माझाच विजय’ : नारायण राणे

सावंतवाडी : पोलीसनामा आॅनलाईन – मराठा समाजाला आरक्षण मिळणे म्हणजे हा माझाच विजय आहे असा दावा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे. आघाडी सरकारनं आरक्षणासाठी राणे समिती स्थापन केली होती. या राणे समितीने जो अहवाल सादर केला त्यानंतर तत्कालीन सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. परंतु सदर आरक्षण हे न्यायालयात टिकू शकलं नाही. परंतु आता मागासवर्गीय आयोगानं जो अहवाल सादर केला तो अहवाल आणि राणे समितीचा अहवाल हा सारखाच आहे असा दावा नारायण राणे यांनी केला. इतकेच नाही तर हा माझाच वियय आहे असं वक्तव्य राणे यांनी केलं.
याशिवाय नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं.आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये आरक्षणाचं विधेयक एकमतानं मंजूर झालं. यावर बोलताना राणे म्हणाले की, “आजचा निर्णय ऐतिहासिक आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन.” इतकेच नाही तर पुढे  आघाडी सरकारच्या घडामोडींची आठवण करून देताना राणे म्हणाले की,  ‘मराठा समाजाला मागास आहे की नाही, याबद्दलचा अहवाल मागासवर्गीय आयोगानं दिला. या आयोगाच्या अहवालानं मराठा समाजाला आरक्षण देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. हा अहवाल आणि आघाडी सरकारच्या काळात मी दिलेला अहवाल सारखाच आहे. त्यामुळे हा माझा विजय आहे,’ असा दावा त्यांनी केला.
गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेली मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी आज पूर्णत्वास गेली आहे. बहुचर्चित मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आले आहे. यावेळी दोन्ही सभागृहात एकमताने मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक विधानसभा पटलावर मांडलं. मराठा समाज आरक्षण विधेयक 2018 या विधेयकास विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसकडून एकमताने मंजुरी दिली. त्यानंतर, अजित पवार यांनीही या विधेयकास एकमताने मंजुरी देत पाठिंबा देत असल्याचं म्हटलं. मराठा समाजाचा SEBC प्रवर्गात समावेश करण्यात आला  असून सदर वधेयकात मराठा समाजाला  16 टक्के आरक्षण देण्यात आले आहे.