ऐकावे ते नवलच ! उंदरांनी ‘नष्ट’ केली तब्बल 2 लाखांची ‘दारू’

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – शासनाच्या विविध खात्यात धान्यामध्ये तसेच इतर वस्तूंमध्ये तफावत आढळली तर संबंधित अधिकारी उंदरांनी कुरताडून धान्य खाल्ले असे सांगून स्वत: नामानिराळे रहात आले होते. अगदी किटकनाशकही उंदरांनी खाल्याचे प्रकरण यापूर्वी राज्यात खूप गाजले होते. पण आता यवतमाळमधील वाईन शॉप मालकाने चक्क उंदरांनी दारु नष्ट केल्याचे कारण दाखविले आहे. एका वाईन शॉपमध्ये उंदरांनी धुडगुस घालून दारूच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या कुरतल्या़ त्यामुळे अक्षरश: दारुचे पाट वाहिले. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये तब्बल २ लाख रुपयांची दारू वाहून गेल्याचे कारण दाखविले आहे.

लॉकडाऊनच्या काळात बीअर बार, वाईन शॉप आणि गोदामातून छुप्या मार्गाने दारु बाहेर काढून ती शौकिनांना तिप्पट चौपट दराने असंख्य दुकानदारांनी विकली. अशी अनेक प्रकरणे पुढे आली आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाईन शॉप, बिअर बारची तपासणी सुरु केली आहे. जिल्हाधिकार्‍यांनी आतापर्यंत १९ जणांचे परवाने कायमस्वरुपी निलंबित केले आहेत. आणखी १० प्रकरणे त्यांच्यापुढे कारवाईसाठी आहेत. एका बार मालकाने एका तरुणाच्या माध्यमातून १३ लाख रुपयांची दारु विकल्याचे प्रकरण समोर आले आहे.

यावेळी एका वाईन शॉपच्या मालकाने आपल्या दुकानात चक्क उंदरांनी धुमाकुळ घातला व दारुच्या बाटल्या कुरताडले. त्यामुळे २ लाख रुपयांची दारू वाहून गेल्याचे दावा केला आहे. दारुच्या स्टॉकमधील तफावत आढळल्यास कारवाई होऊ नये, म्हणून हे सर्व उंदरावर ढकलण्यात आल्याची लिकर लॉबीत जोरदार चर्चा आहे.