ED ची नोटीस कदाचित ‘त्यांच्या’ कार्यालयात अडकली असावी, खासदार राऊतांचा थेट भाजपावर निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाविकास आघाडीचे सरकार स्थापनेत महत्वाची भूमिका निभावणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shiv Sena leader MP Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले असून पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना मंगळवारी (दि. 29) चौकशीसाठी बोलावल्याचे समजते. दरम्यान खा. राऊत यांनी गेले वर्षभर ते सातत्याने भाजप, पंतप्रधान मोदींवर टीकेची झोड उठवत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संजय राऊत आज दुपारी दोन वाजता शिवसेना भवनात पत्रकार परिषदेत घेणार आहेत.

खा. राऊत यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपवर थेट निशाणा साधला. ‘मी ईडीच्या नोटिशीबद्दल काहीच सांगत नाही. भाजपचे नेतेच ईडीची नोटीस आल्याचे सांगत आहेत. त्यांच्याकडे जास्त माहिती आहे. त्यामुळे मी माझा माणूस भाजपच्या कार्यालयात पाठवला आहे. ईडीची नोटीस कदाचित तिथे अडकली असेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. हे पूर्णपणे राजकारण सुरू असल्याच देखील ते म्हणाले.

ईडीची नोटीस अन् राऊतांकडून गाण्याच्या ओळी ट्विट
शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यानंतर आता ईडीने राऊत यांच्याकडे मोर्चा वळवल्याने त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. राऊत यांनी ‘आ देखे जरा किस मे कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथिया,’ अशा एका हिंदी चित्रपटातील गाण्याच्या ओळींचे ट्विट करत एक प्रकारे आव्हान स्वीकारल्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान ईडी, सीबीआय अशा संस्थांनी आपली कार्यालये आता भाजप कार्यालयातच हलवावीत. केवळ भाजपचे विरोधक आहेत, म्हणून जुने प्रकरण उकरून काढून त्यांना त्रास दिला जात आहे. जनतेलाही आता हे समजले आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.