भारतातील ‘त्या’ सायकल गर्लचं इवांका ट्रम्पकडून कौतुक, ओमर अब्दुला म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाची भीती आणि लॉकडाऊनमध्ये काम गेल्यानं उपासमारी यामुळे अनेक परप्रांतीय मजूर आपल्या मूळ गावी परतत आहेत. गेल्या काही दिवसांपासून घरी जाण्यासाठी सुरु असलेली केविलवाणी धडपड दाखवणारे फोटो, व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 15 वर्षाची मुलगी आपल्या वडिलांना सायकलवरून घरी घेऊन जात आहे. या मुलीचं भारतात तर कौतुक झालेच शिवाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्पनंही या मुलीचं कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो ज्योती कुमारी या मुलीचा आहे.

आपल्या जखमी वडीलांना डबलसीट घेऊन तीने गुरुग्राम ते बिहार असा तब्बल 1200 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पूर्ण केला. ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. ही बातमी पाहताच इवांका ट्रम्पनं ट्विट केलं आहे. इवांका म्हणाली, 15 वर्षीय ज्योती कुमारीनं आपल्या जखमी वडिलांना सायकलवर बसवून 7 दिवसांत 1200 किमी प्रवास करून आपलं मूळ गांव गाठलं. सहनशक्ती आणि प्रेमाच्या या वीरगाथेनं भारतीय लोकं आणि सायकलिंग फेडरेशनचंही लक्ष वेधून घेतलं आहे. इवांकाच्या या ट्विटवर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओमर अब्दुला म्हणाले, ज्योतीने 1200 किमी सायकल चालवून जणू तिला एखादा आनंदच मिळाला किंवा तिन एखादं थरारक कृत्य केल्यासारखंच दाखवलं जात आहे. खरं तर सरकारने तिला अपयशी केलं आहे.

कोण आहे ज्योती ?
ज्योती इयत्ता सातवीमध्ये शिकते. तिचे वडील गुरुग्राम येथे ई-रिक्षा चालवायचे. लॉकडाऊनमुळे धंदा बंद झाला आणि ई-रिक्षा मालकाकडे जमा करावी लागली. तर पैसे संपल्याने घर मालकानंही घर खाली करण्यासाठी दबाव आणल्यानं त्यांच्याकडे राहण्यासाठी छप्पर आणि खाण्यासाठी पैसे नव्हते. शेवटी एका ट्रक चालकाकडून काही पैसे उधार घेऊन त्यांनी सायकल खरेदी केली. 500 रुपयांमध्ये सायकल खरेदी करून घरी जाण्याचा निर्णय घेतला. प्रवासादरम्यान मागून कोणतेही वाहन धडकणार नाही याची सतत भीती तिला वाटत होती. जखमी वडील आणि मुलीने 10 मे रोजी गुरुग्राममधून सायकल प्रवास सुरु केला. 16 मे रोजी ते दोघेही त्यांच्या घरी सुखरुप पोहचले.