पुण्यात ८० लाखांची ४ हस्तिदंत हस्तगत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज तत्पर कारवाई करत तस्करीद्वारे हस्तिदंत विक्रीसाठी आलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे. अटकेनंतर चौकशीदरम्यान त्याच्याकडून पोलिसांनी हस्तीदंत हस्तगत केले आहेत़. या ४ हस्तदंतांची आंतरराष्ट्रीय बाजारात ८० लाख रुपये किंमत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक जण शहरात हस्तिदंत विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव भीमा बोग्रीया मुडावत उर्फ चव्हाण (वय ५०) असे असून तो आनंदनगर, हडपसर येथे राहतो. हा व्यक्ती मूळ तेलंगणाचा असल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडील पिशवीची तपासणी केली असता, त्यामध्ये ४ हस्तिदंत असल्याचे दिसून आले ज्यांची किंमत ८० लाख रुपये इतकी आहे. या चारही हत्तीदंतावर कोरीव काम केलेले आहे़

पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली गेली. पोलीस नाईक यशवंत खंदारे आणि मोसीन शेख यांनी संबंधित व्यक्तीला अटक करून त्याच्याकडून हस्तिदंत, २ मोबाईल असा ८० लाख १० हजार १०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे़. पोलीस पुढील तपास करत आहेत.

You might also like