पत्रकार जेडे हत्याकांड प्रकरणात जिग्ना व्होरा ‘निर्दोष’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एका इंग्रजी दैनिकाचे ज्येष्ठ पत्रकार जोतिर्मय डे यांची पवई येथे गाेळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सीबीआयने पत्रकार जिग्ना व्होरा यांच्यासह इतरांच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. यावर आज सुनावणी झाली. जेडे हत्याकांड प्रकरणी पत्रकार जिग्ना व्होराविरोधात सीबीआयकडे पुरेसे पुरावे नाहीत, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी सीबीआयची याचिका फेटाळून लावली. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने याप्रकरणी दिलेल्या जिग्नाच्या दोषमुक्तीला कायम ठेवल्याने जिग्ना यांना दिलासा मिळाला आहे.

मात्र, जेडे हत्याकांड प्रकरणातील दुसरा आरोपी पॉलसन जोसेफच्या दोषमुक्तीला सीबीआयकडून आव्हान कायम आहे. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यामूर्ती संदिप शिंदे यांच्या खंडपीठापुढे आज ही सुनावणी झाली. पत्रकार जोतिर्मय डे यांची पवई येथे ११ जून २०११ मध्ये भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

काय आहे प्रकरण ?
पवई येथे भरदिवसा पत्रकार जोतिर्मय डे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही हत्या अंडरर्ल्वड डॉन छोटा राजनच्या सांगण्यावरून झाल्याचा दावा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केला होता. याप्रकरणी पत्रकार जिग्ना व्होरा, सतीश काल्या, अभिजित शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगनावे, विनोद असरानी, पॉलसन जोसेफ आणि दिपक सिसोडीया यांना अटक करून त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते.

आरोपपत्र दाखल केल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले होते. सीबीआयने याप्रकरणी तपासाअंती ५ ऑगस्ट २०१६ रोजी पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर न्यायालयाने ३१ ऑगस्ट २०१६ रोजी आरोपींवर आरोप निश्चित केले होते. विशेष मोक्का न्यायाधीश एस.एस. अडकर यांच्यासमोर हा खटला चालवण्यात आला. या खटल्याचा अंतिम निकाल सुनावताना पुराव्या अभावी कोर्टाने जिग्ना व्होरा आणि पॉलसन जोसेफ यांना दोषमुक्त केले होते. तर छोटा राजनसह अन्य मारेकऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –