ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरून आल्यापासून घरचे मागेच लागलेत, रिषभ पंतनं ट्विट करून सांगितलं

पोलिसनामा ऑनलाईन – रिषभ पंत ( Rishabh Pant) ने गॅबा कसोटीत नाबाद ८९ धावांची खेळी करून टीम इंडियाला २-१ असा विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ऐतिहासिक मालिका विजयात रिषभ पंत ( Rishabh Pant) हे नाव आवर्जुन घ्यायला हवं. ब्रिस्बेन कसोटीतील मॅच विनिंग खेळीपूर्वी रिषभनं सिडनी कसोटीत ९७ धावांची खेळी केली होती आणि तो खेळपट्टीवर असता, तर कदाचित भारतानं हा सामना जिंकलाही असता. या कामगिरीनंतर रिषभनं टीकाकारांची बोलती बंद केली.

दरम्यान, मायदेशात परतल्यानंतर कुटुंबीय एका गोष्टीसाठी रिषभ पंतच्या मागे लागले आहेत. भारताच्या यष्टिरक्षकानं ट्विट करून ही माहिती दिली आणि त्याचे हे ट्विट व्हायरल झाले आहे. ऑस्ट्रेलियाहून मायदेशात परतलेल्या रिषभकडे घरच्यांनी मागणी केली आहे. “ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून घरी परतलो आहे, तेव्हापासून नवीन घर घेण्यासाठी घरातले मागे लागले आहेत. गुडगांव योग्य राहील का? आणखी काही पर्याय असतील तर सांगा,”असे रिषभनं ट्विट केलं आहे.

 

 

 

 

 

 

 

रिषभने गॅबा कसोटीतही सिंहाचा वाटा उचलला. दुखापतग्रस्त असूनही सिडनी कसोटीत दोन इंजेक्शन व पेन किलर खाऊन तो दुसऱ्या डावात फलंदाजीला मैदानावर उतरला आणि तुफान खेळी केली. मैदानावर असेपर्यंत हा सामना जिंकून देऊ, असा विश्वास रिषभला वाटत होता. पण, ९७ धावांवर त्याची खेळी संपुष्टात आली. त्यानंतर आर अश्विन व हनुमा विहारी यांनी अभेद्य भींत उभी करून सामना अनिर्णीत राखला. नाबाद ८९ धावा चोपून त्यानं टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. रिषभनं पाच डावांमध्ये २७४ धावा चोपल्या.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रिषभनं दमदार कामगिरी केली असली तरी यापूर्वी त्या अपेक्षांवर खरं उतरता आलं नव्हतं. तो म्हणाला,”मला प्रत्येक दिवस स्वतःवर दडपण जाणवत होता. तो खेळाचाच भाग आहे. पण, एक व्यक्ती म्हणून तुमचा स्वतःवर विश्वास असायला हवा. तुम्ही पुढे जात आहात, म्हणजे तुमच्या खेळात सुधारणा होत आहे. या कठीण प्रसंगी मी हेच शिकलो.” पण, आता सर्व चित्र बदलले आहे. टीम इंडियाचा आश्वासक यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून रिषभकडे पाहिजे जातेय.