…अन् बेपत्ता जॅक मा अचानक प्रकटले; व्हिडीओद्वारे दिला संदेश

बिजिंग : वृत्तसंस्था – चिनी सरकारच्या व्याजखोर संस्था आणि सरकारी बँकांविरोधात वक्तव्य केलेले अलीबाबाचे मालक आणि अब्जाधीश उद्योगपती जॅक मा गेल्या काही दिवसांपासून गायब झाले होते. आज ते जगासमोर अचानक प्रकटले आहेत. जागतिक पातळीवर मा यांचे बेपत्ता होणायबाबत तर्कविर्तक लावले जात असताना चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने मा यांचा एक व्हिडीओ जाहीर केला आहे. यानुसार मा यांनी बुधवारी (दि. 20) चीनच्या ग्रामीण भागातील 100 शिक्षकांसोबत व्हिडीओ लिंकद्वारे संवाद साधला असून त्यांनी जेव्हा कोरोना व्हायरस संपेल तेव्हा आपण पुन्हा भेटू, असे सांगितले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून चीनमध्ये अफवांचा बाजार गरम झाला आहे. अलीबाबावर चीन सरकार कब्जा करू शकते, असे बोलले जात आहे. त्याआधी जगभरात प्रसिद्ध असलेले जॅक मा हे गायब झाल्याने मोठ्या अफवा उठल्या होत्या. मात्र ते आज अचानक प्रकटले आहेत. ग्लोबल टाईम्सने मा यांना इंग्रजी शिक्षक ते उद्योजक बनल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांची ओळख सांगताना कुठेही अली बाबाचा उल्लेख केलेला नाही. खरेतर अलीबाबाची स्थापना मा यांनीच केली होती.

दरम्यान अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांच्याकडे ग्राहकांची माहिती आहे. त्यांच्याकडे असलेल्या माहितीच मोल त्यांच्या संपत्तीइतकंच मोठे आहे. मा यांच्या एंट समूहाकडे कोट्यवधी ग्राहकांचा तपशील आहे. चीनमधील वित्तीय नियामक संस्थेला हा तपशील हवा आहे. त्यासाठी मा यांच्यावर बराच दबाव आणला जात आहे. मात्र मा यांनी हा तपशील देण्यास विरोध केला आहे.

बेपत्ता होण्यामागे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी झालेला वाद कारणीभूत
जॅक मा यांच्या बेपत्ता होण्याचे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर चीनचे सरकारी वृत्तपत्र ‘पीपल्स डेली’ने मा यांच्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. जॅक मा यांना एका अज्ञातस्थळी देखरेखीखाली ठेवले आहे. तसेच चिनी सरकारकडून जॅक मा यांना देश सोडून न जाण्याची ताकीद दिल्याची माहिती, एका अहवालातून दिली आहे. जॅक मा यांच्या बेपत्ता होण्यामागे चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेला वाद कारणीभूत असल्याचा दावा केला जात आहे.