जॅक मा प्रकटले आणि अलीबाबाचे नशीब फळफळले, कंपनीला जबरदस्त फायदा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   मा गेल्या वर्षाच्या अखेरपासून बेपत्ता होते. ते नेमके कुठे आहेत याची माहिती कोणालाही नव्हती. त्यांच्या अचानक बेपत्ता होण्यानं चर्चांना उधाण आलं. ते काल (बुधवारी) सर्वांसमोर आले. त्यांचा एक मिनिटापेक्षा कमी कालावधीचा व्हिडीओ समोर आला. त्यात त्यांनी चीन सरकारबद्दल कोणतंही विधान केलं नाही. चिनी सरकारच्या कारवाईमुळे मा यांचा व्यवसाय संकटात आला होता. गुंतवणूदार धास्तावले होते. त्यामुळे जॅक मा नेमके आहेत कुठे असा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर मा सर्वांसमोर आल्यानं गुंतवणूकदारांची एक प्रकारे या संकटातून सुटका झाली आहे.

बुधवारी जॅक मा एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये उपस्थित होते. त्यामुळे अलीबाबा समूहात गुंतवणूक केलेल्यांना मोठा दिलासा मिळाला. अलीबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेडचं बाजारातील मूल्य ५८ अब्ज डॉलरनं वाढली आहे. जॅक मा यांना तुरुंगात धाडण्यात येईल, चिनी सरकार त्यांच्या कंपन्यांवर कब्जा करेल, अशा शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तवल्या जात आहेत. मात्र मा काल जगासमोर आल्यानं या शक्यता मावळल्या आहेत. सरकारच्या परवानगीनं होत असलेल्या परिषदेत मा उपस्थित होते. सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सनं याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं. मा जगासमोर येताच अलीबाबाच्या समभागांचं मूल्य ८.५ टक्क्यांनी वधारले. त्यामुळे अलीबाबाचं बाजारमूल्य ५८ अब्ज डॉलरनं वाढलं.

मा यांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये वित्तीय नियामक संस्था आणि सरकारी कंपन्यांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर मा यांच्या अडचणी वाढल्या. मा अचानक गायब झाले. त्यामुळे जिनपिंग सरकारला अनेक प्रश्न विचारले गेले.जॅक मा यांच्याबद्दल सरकार पुढे कोणतं पाऊल उचलेल, हे आताच सांगता येणार असं चायनीज युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँगचे प्राध्यापक फेंग केचेंग यांनी सांगितलं. मात्र मा यांच्याविरोधात चिनी सरकार फार मोठी कारवाई करणार नसल्याचं सध्या तरी दिसत आहे.