‘कुमारी मुलगी सीलबंद बाटलीसारखी’ : ‘त्या’ प्राध्यापकाची जीभ घसरली 

कोलकाता : वृत्तसंस्था – ‘कुमारी मुलगी सीलबंद बाटलीसारखी’ अशी आक्षेपार्ह पोस्ट एका प्राध्यापकाने फेसबुकवर टाकली.  कनक सरकार असं या प्राध्यापकाचं नाव असून ते कोलकाता येथील जादवपूर विद्यापीठात गेली २० वर्षे ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ विषय शिकवतात. व्हर्जिन ब्राइड-व्हाय नॉट?’ (व्हॅल्यू ओरिएंटेड सोशल काउंसिलिंग फॉर एज्युकेशन) या शिर्षकाखाली त्यांनी ही पोस्ट लिहिली होती.  या घटनेनंतर या  उच्चशिक्षित  प्राध्यापकावर सर्व स्तरातून टीका होऊ लागली आहे.
काय आहे फेसबुक पोस्ट-
‘तुम्हाला जेव्हा एखादी कोल्ड ड्रिक्सची बाटली विकत घ्यायची असते, तेव्हा सीलबंद नसलेली बाटली किंवा बिस्कीटचा उघडलेला पुडा तुम्ही विकत घेता का?’, ‘जैविकदृष्ट्या मुलगी ही जन्मापासून सीलबंद असते. व्हर्जिन गर्ल म्हणजे मूल्यं, संस्कृती, लैंगिक स्वच्छता’ आणि ‘कुमारी मुलगी ही सीलबंद बाटली किंवा सीलबंद पाकिटासारखी असते’ .
या पोस्टवरून लोकांची संतप्त प्रतिक्रिया उमटली. अनेकांनी या पोस्टचे स्क्रीनशॉट शेअर  केले आहेत. सरकार यांच्या या आक्षेपार्ह पोस्टवर टीका झाल्यानंतर त्यांनी फेसबुकवर स्पष्टीकरण देऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.  ‘हे माझं वैयक्तिक मत होतं. सुप्रीम कोर्टानं आयटी कायद्याचं कलम ६६-अ रद्द करत सोशल मीडियावर मत व्यक्त करण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं. तसलिमा नसरीन जेव्हा विशिष्ट धर्मावर लिहितात तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या तत्त्वासाठी आपण त्यांना पाठिंबा देतो. हिंदू देवतांवर लिहिणारे बंगाली कवी श्रीजतो यांनाही आपण पाठिंबा दर्शवतो. मी कोणत्याही व्यक्तीविरोधात किंवा कुणाविरोधात संदर्भाशिवाय किंवा पुराव्याशिवाय लिहिलेलं नाही. मी संशोधन करत असून समाजाच्या भल्यासाठी लिहित आहे. माझा मजकूर मी फक्त ‘कलोम’ आणि ‘मुक्तो कलोम’मध्येच पोस्ट केला आहे. अनेकजण याचे स्क्रीन शॉट पोस्ट करत आहेत. यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. आपलं मत व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. यापूर्वी महिलांच्या बाजूच्या आणि महिलांसाठी लिहिलेले अनेक लेख मी पोस्ट केले आहेत. तुम्ही ते माझ्या टाइमलाइनवर पाहू शकता.’
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा लीना गंगोपाध्याय यांनी या पोस्टबाबत या  प्राध्यापकाला फटकारले आहे. काही लोकांच्या दृष्टीकोनात नगण्य असाच बदल झाला आहे, हेच या पोस्ट वरून जाणवत असल्याचं त्या म्हणाल्या. काही लोक महिलांकडे याच दृष्टीनं पाहतात आणि ते पुन्हा पुन्हा सिद्ध झालंय. ही पोस्ट कोणत्याही उद्देशानं लिहिलेली असो, किंवा ती लक्ष वेधून घेण्यासाठी का लिहिली असेना, मात्र ती निषेधार्हच आहे.
मुलींच्या कौमार्याबाबत आक्षेपार्ह भाष्य केल्याने फेसबुक पोस्ट लिहिल्यानं जादवपूर विद्यापीठाच्या प्राध्यापकावर सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटली.  हे मत माझं वैयक्तिक मत आहे अशी प्रतिक्रिया देत या प्राध्यापकानं वादग्रस्त फेसबुक पोस्ट डिलिट केली आहे.