3 पोलिस कर्मचार्‍यांचे तडकाफडकी निलंबन

डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाइन – फसवणुकीच्या आरोपाखाली बांधकाम व्यावसायिक जगदीश वाघ यास रामनगर पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले होते. परंतु जगदीश वाघ लघुशंकेला जाण्याचा खोटा बहाणा करून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटला. ही घटना रविवारी सकाळी घडली असल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी हलगर्जी केल्यामुळे संबंधित तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी, पोलीस नाईक हेमंत राणे, पोलीस शिपाई सचिन वानखेडे आणि गिरीश शिर्के अशी निलंबन केलेल्या पोलिसांची नावे आहेत.

जगदीश वाघ याने रविवारी सकाळी ९ च्या सुमारास लघुशंका आल्याचे या तिघा पोलिसांना सांगितले. त्याला लघुशंकेसाठी पोलीस ठाण्याच्या बाहेर असलेल्या शौचालयाजवळ घेऊन जाण्यात आले. यावेळी, तिघा पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देत जगदीश वाघ हा तेथून पसार झाला. त्यानंतर, रामनगर पोलिसांनी शोधाशोध सुरु केल्याने अखेर त्यांना यश आले आणि मुंबई विमानतळावरून जगदीश वाघ याला ताब्यात घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना घडली कारण पोलीस ठाण्याचे शौचालय खराब झाल्याने लघुशंकेसाठी जगदीश वाघ याला बाहेर काढण्यात आले होते. यावेळी, तीन पोलीस तेथे हजर असूनही चक्क दिवसाढवळ्या पोलिसांची नजर चुकवून जगदीश वाघ पळून गेला. याबाबतची माहिती डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप राऊत यांनी दिली. घडलेल्या प्रकारामुळे वाघ यांच्यावर नजर ठेवण्यासाठी अजून काही पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच, घटना पुन्हा घडू नये यासाठी कोठडीच्या बाहेर दरवाजा लावण्यात येणार आहे. या प्रकरणी पुढील तपास चालू आहे.

तीन दिवसांची झाली होती पोलीस कोठडी
याबाबत अधिक माहिती म्हणजे, पोलीस कोठडी संपल्याने जगदीश वाघ याला कल्याण न्यायालयात सोमवारी हजर केले गेले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयातर्फे सुनावण्यात आली होती. तसेच, कोठडीतून पळाल्याने त्याच्या अडचणी अजून वाढल्या असून त्याच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप राऊत यांनी सांगितले.

तसेच, राऊत यांनी आवाहन केले की जगदीश वाघ याने ज्या व्यक्तींची फसवणूक केली होती त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन त्याबाबत लेखी अर्ज दाखल करावा. तसेच जगदीश वाघ याने अन्य एका व्यक्तीची देखील ५० लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार होती त्याची देखील चौकशी सध्या सुरु असल्याचे राऊत यांनी सांगितले.

Visit : Policenama.com