देवदासी आणि रिक्षाचालकांना जय गणेश युवा मंचची मदत

पुणे – कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाला. त्याला ७० दिवसांहून अधिक कालावधी झालेला आहे. एवढ्या दिवसांमध्ये रोजगार मिळाला नाही त्यामुळे अनेकांची परवड झाली आहे. उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळी अनेक मंडळांनी गरजू लोकांना मदतीचा हात दिला. बुधवारपेठेतील देवदासी, घरकाम करणाऱ्या महिला, वॉचमन, रिक्षाचालक यांना लॉकडाऊनचा फटका मोठा बसला. अशा व्यवसायांमधील ११० गरजू कुटुंबीयांना १५ दिवस पुरेल एवढे धान्याचे कीट जय गणेश युवा मंचतर्फे नुकतेच देण्यात आले.

या कीटमध्ये पाच किलो गहू, पाच किलो तांदूळ, एक किलो साखर, एक किलो पोहे, अर्धा किलो तूर डाळ, अर्धा किलो तेल, एक किलो कांदे, पाव किलो चहा पावडर, अन्य मसाल्याचे जिन्नस आणि संतूर साबणाची एक वडी अशा वस्तू आहेत. संचारबंदीच्या काळात या सर्वच लोकांची अतिशय बिकट स्थिती झाली. लॉकडाऊनचा कालावधी वाढत गेल्याने तर त्यांची अधिकच परवड होऊ लागली. ही परिस्थिती लक्षात घेऊन जय गणेश युवा मंचने ही मदत केली असे मंचचे अध्यक्ष हेमंत रामचंद्र पवार यांनी सांगितले.