जय शहा यांना मिळाले आणखी एक पद, ‘या’ क्रिकेट संघटनेचे झाले अध्यक्ष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शहा यांची आशिया क्रिकेट परिषद (ACC) च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयचे खजिनदार अरुण सिंह धूमल यांनी सोशल मीडियावरुन ही माहिती दिली आहे. जय शहा यांची शनिवारी (दि.30) सर्वसंमतीने निवड करण्यात आली. शाह हे बांगला देश क्रिकेट बोर्डाचे प्रमुख नजमूल हसन पापोन यांचे स्थान घेतील.

बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल यांनी ट्वीट करुन माहिती देताना शहा यांचे अभिनंदन केले आहे. ‘एसीसी तुमच्या नेतृत्वात उच्च शिखर गाठेल शिवाय आशियातील खेळाडूंना लाभ होईल’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

एसीसीकडे आशिया चषक स्पर्धा आयोजनाची जबाबदारी असते. कोरोनामुळे 2020 च्या आशिया चषकाचे आयोजन पाकिस्तानमध्ये होणार होते. ते स्थगित झाल्यानंतर ही स्पर्धा श्रीलंका किंवा बांगला देशात होण्याची दाट शक्यता आहे. आता शाह यांच्याकडे उपखंडातील या महत्त्वाच्या स्पर्धेच्या आयोजनाबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी राहणार आहे.