ऐसी धाक्कड है …! नऊवारी साडीत स्कायड्रायव्हिंग, शिवरायांना इजिप्तमध्ये अभिवादन 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यभरात काल शिवजयंती  मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पण तमाम मराठी माणसांना आणि त्यातही पुणेकरांना आभिमान वाटावा अशी घटना काल  घडली आहे. पुण्यातील एका महिलेने चक्क इजिप्तमध्ये स्कायडायव्हिंग केले आहे,आणि तेही पारंपरिक मराठमोळ्या वेषात  म्हणजेच नऊवारी साडीत. त्यामुळे मराठी माणसांची मान या महिलेने जगभरात उंचावली आहे. स्कायडायव्हिंग करताना आकाशात ‘जय भवानी ,जय शिवाजी चा जयघोष देखील त्यांनी केला.

इजिप्त मधील कैरो येथे C-130 Hercules aircraft मधून जवळपास १५००० फूट उचंवरून तिने स्कायडाव्हिंग केले. काल सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तिने हे स्कायडायव्हिंग केले. त्यावेळी तिने छत्रपती शिवरायांना अभिवादन करणारा झेंडा देखील फडकावला आणि तेथून पिरॅमिडच्या पायथ्याशी तिने लँडिंग केले. यावेळी तिच्यासोबत  ३५ देशांमधील १५६ स्कायडायव्हरनीही पिरॅमिडजवळ स्कायडायव्हिंग केले.

यापूर्वी शीतलने दोन्ही ध्रुवांवर पॅराशूट जम्पिंग केले असून आतापर्यंत तिने ५०० पेक्षा अधिक वेळा पॅराजंपिंग केले आहे. इजिप्त मधल्या स्कायडायव्हिंग करिता शीतल गेल्या २-३ महिन्यांपासून काम करीत होती. एव्हढेच नाही तर ६ खंडांमध्ये स्कायडायव्हिंग केल्याबद्दल तिला इजिप्तमध्ये सुवर्णपदक देखील देण्याबाबत विचार चालू आहे. आधी हे स्कायडायव्हिंग १४-१६ फेब्रुवारी दरम्यान होणार होते मात्र वातावरण पोषक नसल्यामुळे ही वेळ बदलण्यात आली आणि अखेर १९ तारखेचा नेमका शिवजयंतीचा मुहूर्त साधला गेला. अशी प्रतिक्रिया महाजन यांनी एका वृत्तपत्राला  दिली आहे. दरम्यान हा संपूर्ण कार्यक्रम इजिप्त सरकार आणि लष्कराच्या मदतीने आयोजित करण्यात आला होता.