काँग्रेस नेते सचिन पायलट ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, लोकांना केले ‘हे’ आवाहन

जयपुर : पोलीसनामा ऑनलाइन  –    राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांचा कोविड-19 टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पायलट यांनी ट्विट केले आहे की, माझा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जे लोक मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आले असतील, त्यांनी कृपया आपली टेस्ट करावी. मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे आणि लवकरच ठिक होण्याची अपेक्षा आहे.

सचिन पायलट यांच्या अगोदर राजस्थानमधील अनेक नेत्यांना कोरोना संसर्ग झालेला आहे. यामध्ये परिवहन मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांच्यासह राजस्थानातून येणारे तीन केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, अर्जुन राम मेघवाल आणि कैलाश चौधरी यांचा समावेश आहे. तर, भाजपाचे राज्यसभेचे खासदार डॉ. किरोड़ी लाल मीणा आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे हनुमान बेनीवाल यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याशिवाय भाजपाचे उपनेते राजेंद्र राठोड़, काँग्रेसचे माजी मंत्री रमेश मीणा आणि विश्वास सिंह यांच्यासारख्या अनेक नेत्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

राजस्थानमध्ये कोरोना व्हायरसमुळे गुरूवारी आणखी 13 लोकांचा मृत्यू झाला, ज्यामुळे राज्यात कोरोनामुळे मरणारांचा एकुण आकडा 2032 पर्यंत पोहचला आहे. याशिवाय 2176 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर राज्यात एकुण संक्रमितांची संख्या 2,19,327 झाली आहे.