Ram Mandir Nirman : राजस्थानमध्ये काँग्रेसचे विद्यार्थी नेते करताहेत राम मंदिरासाठी निधी गोळा करण्याचं काम

जयपूर : वृत्तसंस्था – आयोध्या येथे राम मंदिर व्हावे, यासाठी देशभरातून निधी दिला जात आहे. भाजप आणि विशेषत: RSS या कार्यासाठी सर्वात पुढे दिसत आहे. पण आता काँग्रेसही राम मंदिर निर्मितीसाठी मोठं योगदान देत आहे. जयपूरच्या कॉमर्स कॉलेज कॅम्पसमध्ये ‘राम नामा’चा गजर केला जात आहे. या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह (ABVP) काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना NSUI च्या सदस्यही राम मंदिर निर्मितीसाठी निधी गोळा करत आहेत. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि विश्व हिंदू परिषद देशभरात निधी गोळा करण्यासाठी अभियान सुरु करत आहे.

राजस्थानातही राम मंदिर निर्मितीसाठी मदत निधी जमा करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, राज्यात सत्ताधारी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनाही या कामात भगव्या संघटनांना मदत करत आहे. जयपूर येथे कॉमर्स कॉलेज कॅम्पसमध्ये राम नामाचा गजर केला जात आहे. याशिवाय भगवा झेंडाही फडकावला जात आहे. यामागे काँग्रेस विद्यार्थी संघटना (NSUI) आहे, यातील सदस्य राम मंदिर निर्मितीसाठी एक-एक रुपया निधी जमा करत आहे. या कॉलेजमध्ये ABVP सह काँग्रेस संघटनाही निधी जमा करण्यासाठी सरसावली आहे.

दरम्यान, गेल्या काही वर्षांत देशात बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार, काँग्रेसही ‘सॉफ्ट हिंदुत्व’ या अजेंड्यावर काम करत आहे. काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेला याबाबतची माहिती असल्याने त्यांचेही यामागे योगदान आहे.

ABVP फक्त देखावा करतीये : काँग्रेस
NSUI या संघटनेने ABVP, RSS आणि भाजपवर निशाणा साधला आहे. त्यामध्ये NSUI सांगितले, की ABVP, RSS आणि भाजप हे सगळेजण राम मंदिर निर्मितीसाठी मदतीचा फक्त देखावा करत आहे.