Weather Update: ‘या’ राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट, तापमानाचा पारा 9 अंशांनी आला खाली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांत उष्णतेच्या लाटाने त्रस्त असलेल्या राजस्थानमधील पश्चिमी विक्षोभच्या सक्रियतेमुळे कडक उन्हापासून थोडा दिलासा मिळाला आहे. ईशान्य राजस्थानसह अनेक भागात पावसाबरोबर शुक्रवारी वातावरण बदलले, काही भागात मेघगर्जनेसह पाऊस आणि जोरदार वाऱ्याने राज्यातील जनतेला काहीसा दिलासा मिळाला. 29 मे पासून तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने आधीच वर्तविली होती.

अलवरमध्ये पडल्या गारा
हवामान खात्याचा अंदाज योग्य असल्याचे सिद्ध होत आहे. राज्यातील बर्‍याच भागात पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाल्याने हवामान बदलण्यास सुरवात झाली आहे. ईशान्य राजस्थानातील काही भागात दुपारच्या वेळी अचानक हवामानाची स्थिती बदलली आणि ते पाहता पाहता तेथे जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. विशेषत: श्री गंगानगर, भरतपूर आणि अलवर जिल्ह्यातील काही भागात जोरदार वादळ आणि पाऊस पडला. अलवरच्या तपूकडा परिसराच्या आसपासच्या भागातही गारपीट झाल्याचे सांगण्यात येत आहे. श्रीगंगानगर येथे सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत 1.8 मिमी पावसाची नोंद झाली. चूरू येथे देखील पाऊस पडला.

तापमानाचा पारा 9 अंशांनी खाली आला
पश्चिमी विक्षोभचा परिणाम असा झाला की उष्णतेने झगडत असलेल्या लोकांना उन्हापासून थोडा दिलासा मिळाला आहे. आज राज्यातील सर्व भागात तापमानात घट झाली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार अनेक जिल्ह्यात पारा 2 ते 9 अंशांवरून खाली आला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आज सर्वात जास्त उष्णता कोटा येथे होती. कोटा येथे आज तापमान 43.8 अंश सेल्सिअस होते. नुकतेच 50 अंशावर पोहोचलेल्या चुरू जिल्ह्यात तापमान 43.5 अंश सेल्सिअस होते. पावसामुळे श्रीगंगानगर मधील तापमान 40 अंशांच्या खाली पोहोचले. श्रीगंगानगर येथे आज 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर उदयपूर येथे 39.2 अंश तापमान नोंदले गेले. बीकानेरमध्ये 41.5, अजमेर 41.5, जयपूर 41.8, बाडमेर 41.6, जोधपूर येथे 40.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.