सचिन पायलट 12 आमदारांसह सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल, अशोक गहलोत सरकारवर संकट !

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राजस्थानातील सरकार पाडण्यासाठी आमदारांच्या घोडेबाजारासंदर्भात राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने (एसओजी) मोठी कारवाई केली आहे. एसओजीने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर कॉंग्रेसचे 12 आमदार दिल्ली येथे पोहोचले आहेत. उपमुख्यमंत्री सचिन पायलट आधीच दिल्लीत हजर आहेत. सचिन पायलट आणि उर्वरित 12 आमदार सीएम अशोक गहलोत यांच्यावर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व आज पक्षाध्यक्ष सोनिया गांधींना भेटू शकतात. असे म्हटले जात आहे की सचिन पायलट एसओजीच्या एफआयआरमध्ये सरकार पाडून टाकण्याच्या कारस्थानात त्यांच्यावर निशाणा साधल्याने नाराज आहेत.

या दरम्यान कॉंग्रेसने त्या तीन अपक्ष आमदारांची संलग्नता संपवली. आतापर्यंत हे तिन्ही सुरेश टाक, खुशवीर जोजावर आणि ओम प्रकाश हुडला गहलोत सरकारला पाठिंबा देत होते, पण एसओजीने या तिघांविरुद्ध आमदारांच्या घोडेबाजार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या तिघांवर आरोप आहे की सरकार पाडण्यासाठी त्यांनी आमदारांचा घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्र्यांना पाठिंबा

दरम्यान शनिवारी रात्री उशिरा अनेक आमदार व मंत्र्यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना पाठिंब्याची पत्रे दिली आणि गहलोत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. राजस्थानची सीमा देखील रात्री उशिरा सील करण्यात आली आहे. राजस्थानबाहेर विना पास कोणत्याही प्रवेशास परवानगी नाही. तथापि सरकारने कोरोना संसर्गाचे कारण देत सीमा सील करण्यात आल्याचे सांगितले असले तरी सध्याच्या राजकीय घडामोडी लक्षात घेता आमदारांच्या बाहेर जाण्याच्या अपेक्षेने हा निर्णय घेण्यात आला असावा असा विश्वास आहे. एसओजीच्या एफआयआरनंतर आता राजस्थानमध्ये राजकीय पेच गंभीर होत आहे.